
समाजमाध्यमांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा पसरत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपचालकांना पेट्रोल किंवा डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीमध्येच वितरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.
ग्राहकांना प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन, डबे किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या भांड्यांमध्ये पेट्रोल अथवा डिझेल दिल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 10C जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थांच्या खुलेआम विक्रीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व पेट्रोल पंपांवरून खुल्या स्वरूपात इंधन विक्री करण्यास तातडीने मनाई केली आहे. तसेच पंपावरील सुरक्षिततेसाठी पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा चोवीस तास कार्यरत ठेवणे आणि इंधन विक्रीच्या नोंदी नियमित ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंपचालकांवर कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.























































