
जालना महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांना पक्षादेश डावलून भाजपला साथ देणे चांगलेच भोवले आहे. स्वीकृत सदस्य निवडणुकीच्या वेळी पक्षादेश डावलल्याबद्दल काँग्रेसने सात नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला काही ठिकाणी चांगले यश मिळाले होते, मात्र निवडणुकीनंतर काही ठिकाणी पक्षांतर्गत मतभेद व गटबाजी उफाळून आली आहे. जालना महापालिकेत स्वीकृत सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेवेळी काँग्रेसच्या 7 नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेला हरताळ फासत भाजप उमेदवारांना उघडपणे पाठिंबा दिला. काँग्रेसने या घटनेची गांभीर्याने दखल घेत चौकशी समिती नेमली होती. समितीच्या अहवालात संबंधित नगरसेवकांनी पक्षादेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. भाजपला उघडपणे मदत करून पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार 7 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.
यांच्यावर कारवाई
फरुक तुंडीवाले, इम्रान खान, फरहाना अ. रऊफ अंसारी, सुनील बोरडे, मयुरी देने, रुबिना पठाण, अनिल तिरुखे या सात नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


























































