
‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोदरम्यान दिव्यांग व्यक्तींबद्दल केलेल्या अयोग्य आणि आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने युट्युबर व स्टँडअप कॉमेडियन समय रैना याच्यासह विपुल गोयल, बलराज परमजीतसिंग घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर या स्टँडअप कॉमेडियन्सची निर्दोष मुक्तता करत मोठा दिलासा दिला आहे.
सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. ‘स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी’ या पाठीच्या कण्याशी संबंधित दुर्मिळ आणि गंभीर आजाराच्या उपचारांवरील खर्च आणि दिव्यांगांबद्दल या शोमध्ये असंवेदनशील टिप्पणी करण्यात आल्याचा आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाने याआधीच्या सुनावणीदरम्यान समय रैना आणि इतर कलाकारांना दिव्यांगांच्या मदतीसाठी दरमहा किमान दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कलाकारांनी चुका सुधारल्याबाबत शपथपत्र दाखल केले. त्यात त्यांनी विविध कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले; तसेच दिव्यांगांसाठी १२.५ कोटी रुपयांचा निधी गोळा केल्याची माहितीदेखील न्यायालयाला देण्यात आली.































































