दिल्ली मद्य घोटाळा – BRS नेत्या के कविता यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

भारत राष्ट्र समितीच्या विधानपरिषेदच्या आमदार व तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी के कविता यांना दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती. गेल्या पाच महिन्यांपासून त्या तुरुंगात होत्या. अखेर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईडी व सीबीआयने दाखल केलेल्या दोन्ही गुन्ह्यात जामीन मंजूर केल्याने के कविता यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

के कविता यांना दहा लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर तसेच त्यांचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. ”के कविता या गेल्या पाच महिन्यांपासून तुरुंगात आहेत. या प्रकरणात तब्बल 493 साक्षीदार व मोठ्या प्रमाणात कागदपत्र असल्याने त्याच्या तपासासाठी भरपूर वेळ लागणार आहे”, असे न्यायालयाने म्हटले आहे.

याच प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देखील 9 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या खटल्यात आतापर्यंत 400 हून अधिक साक्षीदार आणि हजारो कागदपत्रे सादर करण्यात आली. येत्या काही दिवसांत हे प्रकरण संपण्याची फारशी शक्यता दिसत नाही. अशा स्थितीत सिसोदिया यांना कोठडीत ठेवणे हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन ठरेल, असे न्यायालयाने नमूद करत त्यांना जामीन मंजूर केलेला. कथित मद्य धोरण प्रकरणात मनीष सिसोदिया यांना सीबीआयने 26 फेब्रुवारी 2023 रोजी अटक केली होती. त्यानंतर याच अनुषंगाने मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली 9 मार्च 2023 रोजी ईडीने त्यांना अटक केली.