लष्कराचं मनोबल कमी करू नका! पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी SC ने फेटाळली

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही वेळ याचिका दाखल करण्याची नाही. लष्कराचे मनोबल कमी करू नका, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला आणि याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले.

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यात महाराष्ट्रातील 6 जणांचाही समावेश होता. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. या दहशतवादी हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र यावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच या प्रकरणांच्या चौकशीमध्ये न्यायाधीश तज्ज्ञही नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशीची मागणी करणारी याचिका करण्यापूर्वी या प्रकरणाची संवेदनशीलता पहायला हवी होती. तुमचेही देशाप्रती काही कर्तव्य आहे. ही वेळ याचिका दाखल करण्याची नाही, तर प्रत्येक देशवासियाने दहशतवादाविरुद्ध लढण्याची आहे. यामुळे लष्कराचे मनोबल कमी होऊ शकते, अशा शब्दाच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला फटकारले.

तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना चौकशी करण्यास सांगत आहात. पण अशा प्रकरणाची चौकशीमध्ये न्यायाधीश तज्ज्ञ नाही. ते फक्त निर्णय घेऊ शकतात, त्यामुळे आम्हाला आदेश देण्यास सांगू नका, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले. याचिकाकर्त्याने पहलगाम हल्ल्याची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी केली होती.