सुप्रीम कोर्ट फक्त श्रीमंतांसाठी नाही! गुजरातच्या कंपनीला न्यायालयाने फटकारले

सर्वोच्च न्यायालय फक्त श्रीमंतांसाठी नाही. श्रीमंत पक्षकार प्रकरणे तातडीने सूचिबद्ध करून घेतात, असा संदेश लोकांमध्ये जाता कामा नये. आम्ही तसे घडू देणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी गुजरातच्या बांधकाम व्यावसायिक कंपनीला फटकारले.

वाईल्डवूड्स रिसॉर्टस अँड रिऑलिटीज या कंपनीने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील दाखल केले होते. गीर नॅशनल पार्कजवळ रिसॉर्ट उभारण्यासाठी वाईल्डवूड्स रिसॉर्टस कंपनीला मंजुरी देण्यासंबंधी हे प्रकरण न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणण्यात आले. या वेळी अ‍ॅड. मुकुल रोहतगी यांनी कंपनीच्या अपिलावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. मात्र न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.