
भटक्या कुत्र्यांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून गाजत असून सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्राणीप्रेमींना काही थेट प्रश्न विचारले. आज झालेल्या सुनावणीत खंडपीठाने ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनाही खडे बोल सुनावले. तसेच त्या वास्तवापासून दूर असल्याचे सांगितले.
अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी सार्वजनिक जागांवरील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काय करायला हवे, यासाठी काही सल्ले दिले होते. या सल्ल्यांनाही सर्वोच्च न्यायालयाने झिडकारून लावले. शर्मिला टागोर यांच्या वकिलांनी ‘कुत्र्यांच्या आक्रमकतेची ओळख आणि त्यांच्या स्वभावाचा विचार करण्यासाठी आम्ही एक तज्ञ समिती स्थापन करण्याचा सल्ला देत आहोत. सामान्य आणि आक्रमक कुत्र्यांमध्ये फरक करायला हवा. जॉर्जिया आणि आर्मेनियासारख्या देशांत रंगाचा कोड वापरून कुत्र्यांची विभागणी केली जाते. असा काही उपाय आपल्याकडे राबवला जावा, असेही वकिलांनी सांगितले. त्यावर जे सल्ले अमलात येऊ शकतात ते द्या. वास्तव काय आहे ते पाहा, असे न्यायालयाने सुनावले.






























































