टेनिस क्रिकेटची आयपीएल येतेय ; ‘सुप्रिमो चषक’चे काऊंटडाऊन सुरू. शनिवारी बीकेसी येथे भव्य लाँचिंग!

 ‘टेनिसची आयपीएल’ म्हणून क्रिकेट विश्वात लोकप्रिय असलेल्या दहाव्या सुप्रिमो चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. येत्या 17 ते 21 मे या कालावधीत सांताक्रुझ येथील एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब ग्राऊंडवर ही स्पर्धा रंगणार आहे. तत्पूर्वी, 13 मे रोजी सकाळी 11 वाजता बीकेसी येथील एमसीए येथे या स्पर्धेचा शानदार लाँचिंग सोहळा पार पडणार आहे. यंदा कोणत्या 16 टीम स्पर्धेत सहभागी होणार, स्पर्धेचे मुख्य आकर्षण काय असणार, बक्षिसांची रक्कम आणि मुख्य आकर्षण काय असणार आदी सस्पेन्सवरून या सोहळय़ात पडदा हटणार आहे. त्यामुळे या स्पर्धेविषयी क्रिकेटप्रेमींची आतापासूनच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विभागप्रमुख-आमदार संजय पोतनीस तसेच विभागप्रमुख-आमदार अॅड. अनिल परब यांच्या संकल्पनेतून 2010 साली सुप्रिमो चषक टेनिस क्रिकेट स्पर्धा सुरू झाली. त्यानंतर या स्पर्धेचा डंका क्रिकेट जगतात वाजत राहिला. विभागप्रमुख-आमदार संजय पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली नियमाचे काटेकोरपणे पालन करून दरवर्षी या भव्यदिव्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. एलईडी स्क्रीन तसेच ‘यूटय़ूब’वरून 22 देशांमध्ये थेट प्रक्षेपण, सर्वोत्तम संघ तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱया खेळाडूंवर कार, बाईक, रोख रक्कमसारख्या बक्षिसांचा वर्षाव यामुळे क्रिकेटप्रेमी आतुरतेने या स्पर्धेची वाट पाहत असतात.

 हिंदुस्थानी कसोटी संघ तसेच आयपीएल संघातील अनेक क्रिकेटपटू, हॉकीपटू तसेच सिनेस्टार या स्पर्धेला हजेरी लावत खेळाडूंचा उत्साह वाढवतात. दानशूर उद्योगपती रतन टाटा यांनीदेखील त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून सुप्रिमो चषकासाठी दोन तासांचा बहुमूल्य वेळ दिला हा आयोजकांसाठी स्फूर्ती वाढवणारा क्षण आहे.

 सुप्रिमो चषकाच्या आयोजनातून गरीब आणि होतकरू खेळाडूंना व्यासपीठ मिळते. तसेच गरजूंना मदतीचा हात पुढे करून फाऊंडेशनमार्फत सामाजिक भानदेखील जपले जाते. दुष्काळग्रस्त जनतेसाठी निधी, कर्करोग आणि हृदयरोगासंबंधी आजार असलेल्या रुग्णांनादेखील मदत करण्यात येते. आतापर्यंत 22 हृदय शस्त्रक्रियांचा खर्च फाऊंडेशनने उचलला आहे.