पुण्याला मंत्रिपद मिळालं, त्याचा उपयोग पुण्याला व्हावा, ठेकेदारांना नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिन कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, मंत्रीपद मिळालंय पुण्याला. त्याचा मला आनंदच आहे. पण त्याचा फायदा कॉण्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा ही अपेक्षा आहे. आठ दिवसांत दोनवेळा पुणे शहर तुंबलं, कोयता गँग, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नाबरोबर पुण्यातून पंपन्या बाहेर जात आहेत. पुण्यात प्रशासनच नाही, त्यामुळे पुण्याची अशी परिस्थिती झाली आहे. शिक्षणाचं माहेर घर म्हणून देशातील लोक विद्यार्थी येतात. मात्र, अशा घटनांनी पुण्याचं नाव खराब होत आहे. पुण्याची सगळी परिस्थिती सरकारमुळे झाली आहे. गुन्हेगारीच्या विरोधात महाविकास आघाडीने रस्त्यावर उतरलं पाहिजे. निकाल लागल्यापासून मी शांत झाले आहे. कारण आता जबाबदारी वाढली. पुण्यातल्या इन्व्हेस्टमेंट बाहेर जाणार नाही. यासाठी मराठा चेंबर्ससोबत बैठक घेणार, नोकऱया बाहेर जाणार नाही याची काळजी घेणार आहे.
दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का? बॅनर लागलेत? यावर सुळे म्हणाल्या, बॅनरनं देश चालत नाही. आमचे नेते चोवीस तास कार्यरत असून आमच्या पक्षात सर्वांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तसेच, अजित पवार गटाकडे जो पक्ष आणि चिन्ह आहे, त्याखाली नोटीस आहे. तो पक्ष त्यांचा अद्याप पूर्णपणे झालेला नाही. कोर्टात केस सुरू असून आम्ही ती ताकदीने लढत आहोत.