नरेंद्र मोदी यांनी तिसऱयांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेल्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रीपद न मिळाल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला. भाजप मित्रपक्षासोबत कसा वागतो, हे जवळून पाहिले आहे. यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही असा टोला त्यांनी मारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या एकाही खासदाराला मंत्री पद मिळाले नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना लक्ष्य केले.
अजित पवार गटाला मंत्री पद मिळाले नसल्याबाबत प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, दुसऱयाच्या घरात ढवळाढवळ मी करत नाही. मी भाजपचे वागणे दहा वर्षे जवळून पाहिले. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाला मंत्री पद मिळाले नाही, यात नवल वाटायचे कारण नाही.
मंत्री पद नाही, पण मालमत्ता सुटली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवारांनीही यावरून अजित पवार गटाला लक्ष्य केले. ते म्हणाले की, जे नेते शरद पवारांना सोडून गेले त्यांना मंत्री पद नाही, पण व्यक्तिगत खूप काही मिळाले आहे. प्रफुल्ल पटेल यांना व्यक्तिगत गिफ्ट दिले आहे. ईडीने जप्त केलेली मालमत्ता सोडविली आहे. त्यामुळे मंत्रीपद मिळाले नाही तरी व्यक्तिगत गिफ्ट मिळाले आहे. तर जे सोडून गेले आता त्यांना विधानसभा निवडणुकीत एकच पर्याय असेल ते म्हणजे राष्ट्रवादीऐवजी भाजपच्या चिन्हावर त्यांना लढावे लागेल, असेही रोहित पवारांनी नमूद केले.