सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे वर्शभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास संपूर्णपणे कोसळला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भग्न पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेने शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.
त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. सुप्रिया सुळे यांनी या घटनेचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोबत त्यांनी एक पोस्ट शेअर करत महाराजांच्या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले याची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
”देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री मा. नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने हि प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे”, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.