
काही लोकांनी शेकडो कोटींची संपत्ती कशी गोळा केली, मालमत्ता कशी जमवली हे आता समोर येऊ लागले आहे. धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना फक्त अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागातून रस्त्याच्या कामाच्या नावाखाली कोणतेही काम न करता निधीची हेराफेरी करून 73 कोटी 36 लाख रुपये बोगस बिले काढून उचलण्यात आली. 73 पैसेही बोगस उचलता येत नाहीत. मग एवढा निधी उचलत असताना यंत्रणा काय करत होती? नियोजन खात्याचे कोणतेही नियम न पाळता अधिकाऱयाच्या संगनमताने प्रचंड मोठा घोटाळा झाला आहे. उद्या अजित पवार बीडमध्ये येत आहेत. या घोटाळय़ाचा जाब आपण त्यांना विचारणार आहोत, आमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी नाही दिला तरी चालेल, पण गेलेले माघारी घ्या यासाठी हट्ट धरणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी घोटाळय़ाचे पुरावे समोर दाखवत म्हटले.