
दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बिनबुडाचे, तथ्यहीन आरोप करणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही कायदेशीर नोटीस बजावली आहे. कायदेशीर परिणाम टाळण्यासाठी पुढील चार दिवसांत या नोटीसला उत्तर द्या, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करताना, त्यांची बदनामी करण्यासाठी गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाचा मंच निवडला ही खेदजनक बाब आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त विधान तत्काळ मागे घ्यावे, केलेल्या विधानाबद्दल जाहीर माफी मागावी आणि भविष्यात असे विधान करणार नाही असे सांगावे, असे या नोटीसमध्ये नमूद आहे.
पीठासीन अधिकाऱ्यांनी मर्यादा पाळणे गरजेचे – राम शिंदे
पीठासीन अधिकाऱ्यांनी एखाद्या विषयावर स्वतःचे प्रतिकूल मत असले तरी पीठासीन अधिकारी म्हणून मर्यादा पाळल्या पाहिजेत, असे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱहे यांना सुनावले.