तुम्ही ’मोदी का परिवार’ नाही, सत्तेच्या शिडीची एक पायरी आहात! सुषमा अंधारे यांचे भाजप कार्यकर्त्यांना पत्र

‘ज्या पक्षाला तुम्ही ‘मोदी का परिवार’ मानता, त्या पक्षासाठी तुम्ही परिवाराचे सदस्य नसून सत्तेसाठी लागणाऱया शिडीतील फक्त एक पायरी आहात. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सोबतच्या राजकीय लाभार्थ्यांनी मिळून तुमचा घात केला आहे. हे ओळखून आतातरी इतरांच्या लढाया लढण्यापेक्षा स्वतःच्या घराकडे लक्ष द्या,’ असे आवाहन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना केले आहे.

महापालिका निवडणुकीत उपऱयांवर तिकिटांची खैरात केली गेल्यामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. महाराष्ट्राच्या रस्त्यारस्त्यांवर त्यांचा आक्रोश दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भाजपच्या एकूण कारभाराचा समाचार घेतला आहे. निष्ठावंतांना न्याय देणारी भाजप राहिलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सावध व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे.

भाजप हे विषारी नागांचं वारूळ झालंय!

‘वारूळ बांधणाऱया मुंग्यांना कधी त्या वारुळात राहण्याचे भाग्य लाभत नाही. त्या वारुळात विषारी नाग राहायला येतात. भाजपचंही तेच झालं आहे. जुन्या निष्ठावंतांनी आणि संघाच्या मुशीतून आलेल्या स्वयंसेवकांनी भाजपच्या सत्तेचं वारूळ बांधलं. त्या वारुळातून निष्ठावंतांना काढून तिथे इतर पक्षातले तडीपार गुंड, बलात्कारी, भ्रष्टाचारी, सत्तांध विषारी नाग राहायला आले. त्यांच्यासाठी जागा करून देण्यात आली,’ याकडे अंधारे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले आहे.

तुम्हाला काय मिळालं?

तुम्ही लाखोंच्या देणग्या दिल्यात, वर्षानुवर्ष सतरंज्या उचलल्या, पक्षाचा झेंडा मिरवून खांदा झिजवलात, संघाच्या शाखा निगुतीने चालवल्यात, सुट्टीचा एक रविवार पक्षासाठी दिलात, सोशल मीडियावर पक्षाची बाजू मांडण्यासाठी बुद्धी पणाला लावलीत, लोकांची टीका-टिप्पणी सहन केली, त्या बदल्यात तुम्हाला काय मिळालं, असा प्रश्नही अंधारे यांनी उपस्थित केला.