माजी आमदार आणि भाजप नेते शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना भाजपमधून तात्काळ निलंबीत करावे अशी मागणी रेणापूर तालुक्यातील भाजपच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आमदार रमेश कराड आणि माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांच्यामध्ये शितयुध्द सुरू आहे.
रेणापूर तालुक्यात गावागावात, तालुक्यात पक्षाच्या नेत्यांचे, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे दौरा निश्चित होण्यापूर्वी संबंधित स्थानिक पदाधिकाऱ्यांना पूर्व सूचना दिली जाते. प्रदेश अथवा जिल्हा भाजपच्या वतीने कुठलाही पक्षाचा कार्यक्रम दिला नसताना रेणापूर तालुक्यात भाजप किसान मोर्चाचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी रेणापूर तालुक्यातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ते आणि त्यांचे पुत्र युवा मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी अजितसिंह पाटील कव्हेकर हे रेणापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टी परिवर्तन संकल्प यात्रा या नावाने दौरा करत आहेत.
शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी वेळोवेळी सुपारी घेऊन भाजपला विस्कळीत करण्याचे काम केल्याचा आरोप करत. त्यांनी कधीच कुठल्याही विकास कामासाठी कसलेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे त्यांना पक्षातून तत्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी रेणापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्ष पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.