वेसावेमधील बेकायदा बांधकामांना अभय देणाऱया अभियंत्याचे निलंबन

के पश्चिम अंधेरी विभागातील वेसावे-वर्सोव्याच्या सागरी किनारा क्षेत्रातील बेसुमार बेकायदेशीर बांधकामांना पालिका आयुक्तांच्या निर्देशानंतरही अभय देणाऱया दुय्यम अभियंत्याला पालिकेने निलंबित केले आहे. सोमेश शिंदे असे या दुय्यम अभियंत्याचे नाव आहे. तर पदनिर्देशित अधिकारी स्वप्नील कोळेकर यांचीही बदली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे लाचखोर पालिका अधिकाऱयांचे  धाबे दणाणले आहे.

के पश्चिम विभागात 2022पासून कार्यरत असलेले दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्याकडे प्रभाग क्रमांक 59, 60 आणि 63 यांचा कार्यभार सोपवण्यात आला होता. प्रभाग क्रमांक 59 आणि 63 यामध्ये अनधिकृत बांधकामांविषयी प्रशासनाकडे मोठय़ा प्रमाणात तक्रारी प्राप्त होत होत्या. सहआयुक्त विश्वास शंकरवार आणि के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांनी या सर्व तक्रारींची दखल घेऊन त्यावर कारवाई करण्यासाठी सोमेश शिंदे यांना वारंवार सूचना केल्या होत्या. सोमेश यांना प्रत्यक्ष बोलावून संबंधित ठिकाणी पाहणी करून कारवाई करण्याचेदेखील निर्देश देण्यात आले होते. मात्र सोमेश शिंदे यांनी याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही.

अधिकारी कारवाई करतानाही फिरकले नाहीत

वेसावे भागातील अधिकृत बांधकामांवर 3 जून  रोजी कारवाई नियोजित होती. त्याबाबत निर्देश मिळाल्यानंतरदेखील सोमेश शिंदे यांनी निष्कासनासाठी कोणतीही तयारी केली नाही. तर 3 जून आणि 4 जून रोजी प्रत्यक्ष निष्कासन कारवाई सुरू असताना सोमेश शिंदे यांनी निष्क्रियता दाखवली. सहआयुक्त, सहाय्यक आयुक्त व इतर सहकारी प्रत्यक्ष घटनास्थळी भर उन्हात उभे राहून दिवसभर कारवाई करीत असताना सोमेश शिंदे हे खासगी वाहनात वातानुकुलन यंत्रणा सुरू करून चक्क बसून राहिले.

कारवाई करण्यासाठी विशेष पथक

वेसावेतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी नव्याने नेमलेल्या विशेष पथकामध्ये पथक प्रमुख म्हणून प्रभारी पदनिर्देशित अधिकारी अशोक अदाते, सहाय्यक अभियंता पंकज बनसोड, दुय्यम अभियंता जयेश राऊत, दुय्यम अभियंता परेश शहा, दुय्यम अभियंता सिद्धार्थ अग्रवाल यांचा समावेश आहे.