
प्रभादेवी येथील चवन्नी गल्लीतील बळीराम सावंत क्रीडानगरीत ‘राजाभाऊ देसाई स्मृती चषक’ कबड्डी स्पर्धेचा रणसंग्राम मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना चढाई आणि पकडीचा अटीतटीचा थरार अनुभवायला मिळाला. सलामीच्या लढतींमध्ये इच्छाशक्ती क्रीडा मंडळ, एसएसजी फाउंडेशन, पार्ले स्पोर्ट्स क्लब आणि अंकुश स्पोर्ट्स क्लब यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत स्पर्धेत धडाकेबाज सुरुवात केली आहे. टी-20 विश्वचषकाच्या रणधुमाळीनंतर सुरू झालेल्या या अस्सल ग्रामीण कबड्डीच्या मेजवानीने मुंबईतील क्रीडाप्रेमींना अक्षरशः खिळवून ठेवले.
उपनगर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर, आमदार महेश सावंत आणि विश्वास मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन झाले. पहिल्या सत्रात पालघरच्या इच्छाशक्ती क्रीडा मंडळाने लायन्स स्पोर्ट्स क्लबविरुद्ध 42-40 असा अत्यंत निसटता विजय मिळवला. यश निंबाळकर आणि योगेश राठोड यांच्या चढायांनी इच्छाशक्तीला सुरुवातीला मोठी आघाडी मिळवून दिली होती, मात्र लायन्सच्या राज आचार्य आणि विशाल कटकटे यांनी झुंजार पुनरागमन करत सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार केला. दुसरीकडे, भारतीय रेल्वेचा स्टार खेळाडू पंकज मोहिते याने एसएसजी फाउंडेशनसाठी 11 गुणांचा वादळी खेळ करत प्रतिस्पर्ध्याचा 53-31 असा धुव्वा उडवला. त्याला सूरज जाधव आणि तेजस टक्के यांनी मोलाची साथ दिली.
इतर सामन्यांमध्ये अंकुश स्पोर्ट्स क्लबने सिद्धीप्रभा फाउंडेशनवर 34-24 अशी मात केली, ज्यामध्ये सुशांत साहिलच्या पकडी निर्णायक ठरल्या. पार्ले स्पोर्ट्स क्लबने दोन विजय नोंदवत आपले वर्चस्व सिद्ध केले. पहिल्या सामन्यात त्यांनी गोल्फादेवी सेवा मंडळाचा 35-34 असा एका गुणाने पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात अमर क्रीडा मंडळाचा 45-28 असा सहज पाडाव केला. दिवसाच्या अखेरीस इच्छाशक्ती आणि गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब यांच्यातील सामना 42-42 असा बरोबरीत सुटला. शार्दुल पाटीलच्या 16 गुणांच्या झंझावाती खेळामुळे गुड मॉर्निंगने विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या, मात्र यश निंबाळकरच्या निर्णायक चढायांनी सामना बरोबरीत रोखण्यात यश मिळवले.



























































