जागतिक स्तरावर हिंदुस्थानचे आणि महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱया पदक विजेत्यांना आणि जगज्जेत्यांना रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे, पॅरिस पॅरालिम्पिकमधील रौप्यपदक विजेता गोळाफेकपटू सचिन खिलारी आणि बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक विजेत्या हिंदुस्थानी संघातील विदित गुजराथी व दिव्या देशमुख या मराठमोळय़ा खेळाडूंना राज्य शासनाच्या वतीने बक्षिसांचे धनादेश आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दोन महिन्यांपूर्वी राज्य शासनाने ऑलिम्पिक विजेत्या स्वप्नील कुसाळेला रोख पुरस्कार जाहीर केला होता, मात्र त्यांना दुप्पट वाढ करत तो आज त्याला देण्यात आला. त्याला 2 कोटी रुपये तसेच त्याच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांना 20 लाख रुपये, रौप्यपदक विजेता पॅरालिम्पियन सचिन खिलारीला 3 कोटी, तर त्याचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना 30 लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारांचा वर्षाव
बुडापेस्टमध्ये (हंगेरी) सप्टेंबरमध्ये झालेल्या 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पुरुष व महिला गटात हिंदुस्थानच्या संघांनी सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. या संघातील विदित गुजराथी व दिव्या देशमुख या महाराष्ट्रीय खेळाडूंचा राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी एक कोटी रुपयांचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. शिवाय त्यांचे मार्गदर्शक अनुक्रमे संकल्प गुप्ता व अभिजित पुंटे यांनाही प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे. विदित गुजराथी स्पर्धेकरिता परदेशात असल्यामुळे त्यांच्या वतीने त्याचे वडील डॉ. संतोष गुजराथी यांनी, तर अभिजित पुंटे यांच्या वतीने त्यांच्या पत्नी मेघना पुंटे आणि संकल्प गुप्ता यांच्या वतीने त्यांचे वडील संदीप गुप्ता यांनी सन्मान स्वीकारला.