
>> स्वप्निल साळसकर
कायमस्वरूपी दिव्यांग आले तरी न हरता आयुष्याची वाट वेगळ्या स्वप्नांनी साकारणारे प्रकाश सोगम. गावातील सुख नदीच्या डोहात मारलेला सूर त्यांना जलतरणपटू म्हणून ओळख देऊन गेला. आजवर जिल्हा व राष्ट्रीय पातळीवर 150 पदकांचे मानकरी ठरलेल्या प्रकाश सोगम यांच्या जिद्दीची ही कथा.
सुख नदीत लहानपणी मारलेली डुबकी राष्ट्रीय स्तरापर्यंत घेऊन जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र हे खरे ठरले आहे ते म्हणजे वैभववाडी तालुक्यातील कुसुर या छोटय़ाशा गावात जन्मलेल्या दिव्यांग जलतरणपटू प्रकाश सोगम यांच्या बाबतीत. जिद्दीचे पंख लाभलेल्या सोगम यांनी आतापर्यंत जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत 150 पदके प्राप्त केली आहेत. तरुणालाही लाजवेल अशा वयाच्या 57 व्या वर्षीही सोगम यांची जिद्द वाखाणण्यासारखी आहे.
कुसुर या गावीच प्रकाश सोगम यांचा जन्म झाला. दोन वर्षांचा असताना आलेला ताप प्रकाश यांना दिव्यांग करून जाईल याची पुसटशी कल्पनाही नसलेल्या आई-वडिलांनी शेतात काबाडकष्ट करून त्याला बरे करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, परंतु त्यांना अपयश आले. नियतीने दगा दिला आणि दिव्यांगत्व कायमस्वरूपी नशिबी आले. गावातील सर्व सवंगडी सुख नदीच्या डोहात सूर मारायचे. ते पाहून प्रकाश यांनी मनाशी निश्चय केला. एके दिवशी ठरवलं आणि पाण्यात उडी मारली. त्या मारलेल्या उडीनेच त्याला राष्ट्रीय स्तरापर्यंत नेले अन् इतरांपेक्षा वेगळा असल्याचे सोगम यांनी दाखवून दिले.
गावामध्येच दहावीपर्यंत शिक्षण झाले. मात्र पावसाळ्यात लाकडी साकव ओलांडून शाळेत जाणे जमायचे नाही. यामुळे इंग्लिश विषयात दहावीत सोगम नापास झाले. त्यानंतर घडय़ाळ दुरुस्तीचा कोर्स करून वैभववाडी शहरात 1985 ते 89 या कालावधीत घडय़ाळ दुरुस्तीचा स्टॉल सुरू केला. त्यामध्ये एसटीडी बूथही होते. सोगम यांच्या कुटुंबात एकूण सात भावंडे होती. 1990 मध्ये प्रथम पवईमध्ये आपल्या भावाकडे काही वर्षे काढल्यानंतर ते पुन्हा गावी परतले आणि काही वर्षांनंतर बहिणीचे लग्न झाल्यावर तिच्याकडे वरळीमध्ये राहू लागले. याचदरम्यान नापणे येथील एक दिव्यांग महिलेशी ओळख झाली आणि हाजीअली येथील बुक बायडिंगचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी एका छोटय़ाशा नोकरीला सुरुवात केली. मात्र शाळा चुकवून नदीत पोहलेल्याचा आनंद वारंवार त्यांना आठवण करून देत होता.
एकदा वरळीमधील गीता टॉकीजमध्ये गेलेल्या सोगम यांना सिनेमाअगोदर एक दिव्यांग व्यक्ती पोहताना दिसली. त्या मार्गदर्शकांचे नाव वाचले तर राजाराम घाग होते. चिपळूण दहिवलीमधील घाग हे आपलीच मराठी व्यक्ती आहे. त्यांचा शोध घेत त्या वेळी रेल्वेतील डीआरएममधील कार्यालयात भेट घेतली. इंग्लिश चॅनल पार करणारे आशिया खंडातील दुसरे जलतरणपटू घाग यांच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धेत प्रकाश यांनी एकूण 150 पदके मिळवली आहेत. याचबरोबर मित्र सुरेश बसनाईक यांचीही खंबीर साथ मिळाली आणि पोहण्याला खरी गती मिळाली. मग स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात झाली. सोगम यांचे दिव्यांग मुलीशी लग्न झाले. त्यांना एक मुलगा असून सध्या तो बारावीमध्ये शिकत आहे. घाग हे दिव्यांग मुलांना मोफत दादर शिवाजी पार्क येथील गांधी टँकमध्ये दर रविवारी दुपारी प्रशिक्षण देत आहेत.
सोगम यांनी पहिलीच स्पर्धा अहमदाबादमध्ये गाजवली. राष्ट्रीय पातळीवरील या आथलेटिक्स तिन्ही प्रकारांत गोल्ड मेडल मिळाले. दरवर्षी होणाऱया नेव्हीच्या ऑल इंडिया विकलांग स्पर्धेमध्ये भाग ते घेत असून वेस्ट बंगाल, दिल्ली, मध्य प्रदेश येथील राष्ट्रीय स्पर्धेतही त्यांनी गोल्ड, सिल्वर मेडल प्राप्त केली आहेत. राज्यांतर्गत कोल्हापूर, पुणे स्पर्धांमध्ये सोगम भाग घेतात. महत्त्वाचे म्हणजे नागपूरमध्येच त्यांना पाच सुवर्णपदके मिळाली असून ती कायम लक्षात राहण्यासारखी असल्याचे सोगम सांगतात. महाराष्ट्र शासनाचा 2003-2004 सालचा जिल्हा क्रीडा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे, परंतु शिवछत्रपती पुरस्काराची खंत त्यांच्या मनात कायम आहे. सोगम यांना बालनाटय़ स्पर्धेचीही आवड असून त्यांनी अनेक बालनाटकांतून कामही केले आहे.
पैशांअभावी परदेश संधी हुकली
गंगा नदीत 15 कि.मी. तसेच राष्ट्रीय स्तरावरील 7 कि.मी., 9 कि.मी., 11 कि.मी. अशा स्पर्धा प्रकाश यांनी लीलया जिंकल्या. 2001 साली भूतान आणि त्याअगोदर इंग्लंडला जायची संधी मिळाली, परंतु पैशांअभावी त्यांना परदेशात जाता आले नाही याची सल आजही प्रकाश यांना बोचते आहे.