टी-20 वर्ल्ड कपमध्ये चौकार-षटकारांची फटकेबाजी गायब असली तरी आता विजयासाठी संघाचा संघर्ष सुरू झालाय. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात धोकादायक टीम म्हणून लौकिक असलेल्या पाकिस्तानला अमेरिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सुपर ओव्हरमध्ये मानहानिकारक पराभवाची झळ बसली आणि पाकिस्तान खतरे में सापडला. अमेरिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यातील पराभवामुळे पाकिस्तानवर साखळीतच बाद होण्याचे संकट ओढावले आहे, तर अमेरिकेला सुपर एटमध्ये स्थान मिळवण्याची संधी निर्माण झालीय. त्यामुळे आता सुपर एटमध्ये स्थान मिळवणे कोणत्याही संघासाठी सोप्पे नसणार याचे संकेत मिळाले आहेत.
यंदा टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ खेळत असले तरी अ गटातून हिंदुस्थान आणि पाकिस्तान, ब गटातून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, क गटातून न्यूझीलंड, यजमान वेस्ट इंडीज आणि ड गटातून दक्षिण आफ्रिका, श्रीलंका या आठ संघांना सुपर एटमध्ये पाहिले जात आहे. त्यातच ड गटातून दक्षिण आफ्रिकेसह श्रीलंका, बांगलादेश आणि नेदरलॅण्ड्स या तिघांपैकी कुणीही सुपर एट गाठू शकतो. अशीच स्थिती क गटातही. तरीही हिंदुस्थान, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या सहा संघांचा प्रवेश निश्चित मानला जात होता. पण अमेरिकेच्या विजयामुळे अ गटात सुपर एटसाठी तिसरा दावेदारही निर्माण झाला आहे. 14 जूनला अमेरिकेने आयर्लंडचा पराभव केला तर त्यांच्यासाठी सुपर एटचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे सुपर एटमध्ये पोहोचणारा दुसरा संघ हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यापैकी एक असेल.
…तर पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात
रविवारी हिंदुस्थानविरुद्ध होणारा ब्लॉकबस्टर सामना पाकिस्तानने गमावला तर त्यांच्यासाठी सुपर एटचे सारे मार्ग बंद होतील. मात्र ते हिंदुस्थानला नमवण्यात यशस्वी ठरले तर आयर्लंड आणि कॅनडाविरुद्धचा सामना जिंकून त्यांना सुपर एटच्या शर्यतीत आपले स्थान राखता येईल. आताच्या घडीला अमेरिका, पाकिस्तान आणि हिंदुस्थानने प्रत्येकी तीन-तीन सामने जिंकले तर नेट रनरेटमध्ये अव्वल असलेले दोन संघ पुढे जातील. त्यामुळे सुपर एटमध्ये कोण असेल हे 9 जूनला अधिक स्पष्ट होईल.