पाकिस्तानला अमेरिकनने नव्हे, हिंदुस्थानींनीच हरवले

अमेरिकेने पाकिस्तानला हरवून टी-20 वर्ल्ड कपमध्ये खळबळ माजवली. या विजयाने अमेरिकन क्रिकेट संघाची आणि क्रिकेटप्रेमींची छाती अभिमानाने फुलली, पण या विजयाने हिंदुस्थानीही आनंदित झाले. कारण पाकिस्तानला अमेरिकन खेळाडूंनी नव्हे, तर हिंदुस्थानी खेळाडूंनी हरवलेय. एक म्हणजे कर्णधार मोनांक पटेल आणि दुसरा मुंबईकर सौरभ नेत्रावळकर.

अमेरिकेच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे मोनांक पटेल आणि सौरभ नेत्रावळकर हे दोघेही हिंदुस्थानी आहेत. हिंदुस्थानात क्रिकेट करीअर बनविण्यासाठी फार संघर्ष करावा लागत असल्यामुळे त्यांनी नोकरीच्या शोधात अमेरिका गाठली आणि तेथेच क्रिकेट खेळू लागले.

सौरभ 2010 साली हिंदुस्थानच्या 19 वर्षाखालील संघासाठी केएल राहुल, जयदेव उनाडकट, मयांक अगरवालसह वर्ल्ड कपमध्ये खेळला आहे. एवढेच नव्हे तर, 2013 साली त्याने मुंबईसाठी रणजी पदार्पणही केले. कॉम्प्युटर इंजिनीअर असलेला सौरभ नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत पोहोचला आणि तिथलाच झाला. मुंबईत आपले क्रिकेट करीअर होत नसल्यामुळे त्याची पावले अमेरिकेकडे वळली आणि तो अमेरिकेचा कर्णधारही झाला. अशीच काहीशी स्टोरी विद्यमान कर्णधार मोनांक पटेलची आहे. तोसुद्धा गुजरातच्या 16 वर्षाखालील आणि 19 वर्षाखालील संघातून खेळला, पण हिंदुस्थानच्या 19 वर्षाखालील संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर तो न्यू जर्सीत स्थायिक झाला आणि त्याने तेथे क्रिकेटऐवजी हॉटेल व्यवसायात नशीब आजमावण्याचे ठरवले. मग त्याने तेरियाकी मॅडनेस नावाचे चायनीज रेस्टॉरण्ट उघडले, पण या व्यवसायातही प्रचंड नुकसान सोसल्यानंतर त्याची पावले पुन्हा क्रिकेटकडे वळली. अमेरिकाही क्रिकेटमध्ये असावी म्हणून स्थानिक हिंदुस्थानी धडपड करू लागले. त्यांच्या प्रयत्नांना वेगात यश लाभले. अमेरिकाही क्रिकेट खेळू लागली आणि त्यात अनेक हिंदुस्थानी वंशाच्या खेळाडूंना संधीही मिळू लागली. त्यात मोनांक आणि सौरभचाही समावेश आहे.

अमेरिकेचा संघ प्रथमच टी-20 वर्ल्ड कप खेळतोय आणि प्रथमच ते वर्ल्ड कपचे यजमानपद भूषवत आहेत. त्यामुळे हा अमेरिकन संघ निम्मा हिंदुस्थानीच आहे. काल पाकिस्तानविरुद्ध अमेरिकन संघात मोनांक, सौरभसह नितीश कुमार, हरमीत सिंह, जसदीप सिंह हे पाच हिंदुस्थानी होते आणि अली खान हा पाकिस्तानी होता.

काल पाकिस्तानी फलंदाजांना रोखण्याची किमया सौरभ नेत्रावळकरच्या माऱयाने केली. त्याने 4 षटकांत 18 धावा देत मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद हे दोन महत्त्वाचे बळी घेतले. सौरभच्या गोलंदाजीवर बाबर चाचपडत खेळत होता. सौरभच्या भेदक माऱयानंतर मोनांक पटेलने आपल्या फलंदाजीची कमाल दाखवत पाकिस्तानी गोलंदाजांना चोपण्याचा पराक्रम केला. त्याच्या फलंदाजीमुळेच पाकिस्तानी गोलंदाजांचे मनोधैर्य खचले आणि अमेरिकेने सामन्यावर आपली पकड मजबूत केली. त्यामुळे डल्लासवर पाकिस्तानला खल्लास अमेरिकनने नव्हे, तर मोनांक आणि सौरभ या हिंदुस्थानींनीच केलेय.