टी20 वर्ल्ड कप आता रोमांचक स्थितीमध्ये पोहोचला आहे. दुबळ्या वाटणाऱ्या संघांनी आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवत बलाढ्य संघांना धुळ चारली आहे. त्यामुळे स्पर्धेतील गणिते बदलताना पाहायला मिळत आहेत. अशातच अफगाणिस्तानने बलाढ्य न्युझीलंडचा 84 धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानच्या विजयात कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) खेळाडूची खेळी महत्वपूर्ण ठरली. या विजयासहित एक अनोखा विक्रम त्याने आपल्या नावावर केला.
अफगाणिस्तान आणि न्युझीलंड यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत न्युझीलंडचा तब्बल 84 धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानच्या भेदक गोलंदाजीपुढे न्युझीलंडच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. अवघ्या 75 या धावासंख्येवर न्युझीलंडचा संपूर्ण संघ तंबुत परतला. अफगाणिस्तानच्या या विजयात गोलंदाजांची भूमिका महत्वाची होतीच. परंतू त्याचबरोबर फलंदाजांनी केलेल्या आक्रमक खेळीचा सुद्धा महत्वाचा वाटा होता. अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज याने केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे अफगाणिस्तानला टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये चांगली धावसंख्या उभारता आली. गुरबाजने न्युझीलंडविरुद्ध 56 चेंडू्ंमध्ये 80 धावांची वादळी खेळी केली. या खेळीमध्ये 5 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. या सामन्यात गुरबाजने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला.
गुरबाज हा टी20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही वेळा विरोधी संघापेक्षा अधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. गुरबाजने युगांडाविरुद्ध 76 धावांची खेळी केली होती. या सामन्यात युगांडाचा संपूर्ण संघ 58 या धावसंख्येवर ऑलआउट झाला. तसेच न्युझीलंडविरुद्ध गुरबाजने 80 धावांची खेळी केली. या सामन्यात न्युझीलंडचा संपूर्ण संघ अवघ्या 75 या धावसंख्येवर तंबूत परतला. दोन्ही सामन्यांमध्ये गुरबाजची धावसंख्या विरोधी संघापेक्षा जास्त होती. त्यामुळे गुरबाज हा टी20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही सामन्यांमध्ये विरोधी संघांपेक्षा अधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. गुरबाज हा IPL 2024 मध्ये विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा भाग होता.