अर्धशतकाविना ऑस्ट्रेलियाने केलेल्या 201 धावांच्या विक्रमी धावसंख्येचा गतविजेता इंग्लंड पाठलाग करू शकला नाही आणि ऑस्ट्रेलियाने 36 धावांनी विजय नोंदवत सुपर एटमधील आपले स्थान जवळजवळ निश्चित केले. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे इंग्लंडचे आव्हान अडचणीत आले आहे. स्कॉटलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे इंग्लंडला एका गुणावर समाधान मानावे लागले होते.
इंग्लंडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीची संधी दिली आणि त्यांनी या संधीचे सोने केले. आघाडीच्या पाचही फलंदाजांनी जोरदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कपमधील सर्वोच्च 201 ही धावसंख्या उभारून दिली. तसेच यंदाच्या वर्ल्ड कपमधीलही पहिलेच द्विशतक आहे. ऑस्ट्रेलियाच्या 202 धावांचा पाठलाग इंग्लंडला झेपलाच नाही. फिल सॉल्ट (37) आणि जोस बटलरने (42) यांनी 73 धावांची सलामी देत इंग्लंडला खणखणीत सलामी दिली, पण या भागीनंतर इंग्लंडला अपेक्षित धावगती कोणीच मिळवून देऊ शकला नाही. इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना बाद करण्याची किमया ऍडम झम्पाने केली आणि त्याचा हाच मारा विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने 28 धावांत 2 विकेटस् टिपल्या. त्याच्यासह सर्वच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी प्रभावी मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांना मोठय़ा फटक्यांपासून रोखत विजयापासून दूर नेले. त्यामुळे इंग्लंड 20 षटकांत 6 बाद 165 धावाच करू शकला आणि ऑस्ट्रेलियाने 36 धावांनी दमदार विजय नोंदविला.
हेड-वॉर्नरचा झंझावात
आज ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी जोरदार फलंदाजी करत इंग्लिश गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. ट्रव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ केला. दोघांनी 5 षटकांत 70 धावांची सलामी देत ऑस्ट्रेलियाच्या विक्रमी धावसंख्येचा पाया रचला. हेडने आयपीएलची आठवण ताजी करणारी खेळी करताना 18 चेंडूंत 3 षटकार खेचत 34, तर वॉर्नरने 16 चेंडूंत 4 षटकारांचा पाऊस पाडत 39 धावा ठोकल्या. मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनिस यांनी खणखणीत फटकेबाजी करत संघाला द्विशतकी झेप मारून दिली.
इंग्लंडचा संघर्ष वाढला
पहिला सामना पावसामुळे रद्द आणि दुसऱया सामन्यात पराभव, त्यामुळे इंग्लंडचा सुपर एट प्रवेश अडचणीत आला आहे. दुसरीकडे स्कॉटलंडने नामिबियाला नमवले आहे आणि ओमानविरुद्धही विजय मिळवत त्यांनी 5 गुणांसह सुपर एटसाठी आपला दावा मजबूत केला आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया आपला नामिबियाविरुद्धचा सामना जिंकून सुपर एट निश्चित करतील, तर इंग्लंडला नामिबिया आणि ओमानविरुद्ध मोठे विजय मिळवत स्कॉटलंडला नेट रनरेटमध्ये मागे टाकावे लागणार आहे. त्यातच ‘ड’ गटात एखादा धक्कादायक निकाल लागला तर इंग्लंडचे काही खरे नसेल.