T20 World Cup 2026 ची तोडफोड फटकेबाजी ‘या’ तारखेपासून सुरू होणार! फायनलचं ठिकाण अजूनही गुलदस्त्यात

टी-20 World Cup 2026 हिंदुस्थान आणि श्रीलंका या दोन देशांच्या संयुक्त आयोजनामध्ये खेळला जाणार आहे. 20 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमवणार असून वर्ल्ड कप जिंकण्यासाठी एकमेकांना कडवी झुंज देणार आहेत. त्यामुळे ICC ने सुद्धा कंबर कसून या स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली आहे. फेब्रुवारी 2026 ते मार्च दरम्यान वर्ल्ड कपचा तोडफोड कार्यक्रम रंगणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्कंठा सुद्धा शिगेला पोहोचली असून आता त्याच्या संभाव्य तारखा समोर आल्या आहेत. मात्र अंतिम सामना कोणत्या देशात खेळला जाणार याबाबात अजूनही सस्पेन्स कायम आहे.

ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार, टी-20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारीला सुरू होणार असून 8 मार्चपर्यंत खेळला जाणार आहे. या कालावधीत हिंदुस्थानात कमीत कमी पाच आणि श्रीलंकेमधील दोन स्टेडियमवर सामने खेळले जाणार आहेत. परंतु याबाबत ICC ने अद्याप वेळापत्रकाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे कोणते सामने कोणत्या देशात आणि कोणत्या स्टेडियमवर खेळले जाणार हे निश्चित नाही. पुढील काही दिवसांमध्ये याची घोषणा होण्याची शक्यता आहे. परंतु टी-20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना अहमदाबाद किंवा कोलंबोमध्ये खेळली जाण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान तणावपूर्ण संबंधामुळे अंतिम सामन्याचे ठिकाण बदलू शकते.

टी20 वर्ल्ड कपसाठी आतापर्यंत 15 संघ पात्र ठरले आहेत. यामध्ये हिंदुस्थान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, अफगानिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, अमेरिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, नेदर्लंड आणि इटली या देशांचा समावेश आहे. उर्वरीत पाच संघ अद्याप निश्चित झालेले नाहीत. या पाच संघांमधील दोन संघ दक्षिण आफ्रिका पात्रता फेरीतून आणि तीन संघ हे आशिया आणि पूर्व आशिया पॅसिफिक पात्रता फेरीतून निवडले जाणार आहेत.