तुझे घाणेरडे तोंड उघडण्यापूर्वी शिखांचा इतिहास जाणून घे…हरभजन सिंगने कामरानला फटकारले

टी20 विश्वचषक 2024 मध्ये हिंदुस्थानने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला. रविवारी झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमलने अर्शदीप सिंगबद्दल जातिवाचक टिप्पणी केली. अर्शदीपबद्दल बोलताना कामरानने शीख समुदायाबाबत वादग्रस्त विधान केले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.कामरान अकमलच्या या वक्तव्यानंतर हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने त्याला फटकारले आहे.

पाकिस्तान संघ विजयासाठी 119 धावांचा पाठलाग करत होता, बुमराहने 19 व्या षटकात तीन धावा दिल्या होत्या आणि शेवटच्या षटकात अर्शदीपला गोलंदाजी करावी लागली होती. कामरान अकमलने एका टीव्ही चॅनलवर सांगितले की, अर्शदीपला 20 वे षटक टाकायला दिले जाऊ नये, तसे झाले तर पाकिस्तान संघ जिंकेल. मात्र, अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी केली आणि हिंदुस्थानला सामना जिंकण्यात यश आले. कामरान अकमलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर चाहतेही संतापले.

हरभजनने आपल्या पोस्ट केलेल्या संदेशात कामरान अकमलचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, तो व्हिडिओ एआरवाय न्यूजचा आहे, या व्हिडिओमध्ये कामरान अकमल म्हणाला, पाहा अर्शदीप सिंगला शेवटची ओव्हर टाकायची आहे. तुम्हाला माहित आहे की 12 वाजले आहेत. यानंतर कामरान हसायला लागतो. त्याचे सहकारी तज्ञ म्हणतात, कोणत्याही शिखांना 12 वाजण्याची वेळ देऊ नये.

या वक्तव्यावर हरभजन सिंगने कामरान अकमलवर जोरदार टीका केली आहे. हरभजन सिंग म्हणाला, कामरान अकमल, तुझे घाणेरडे तोंड उघडण्यापूर्वी शिखांचा इतिहास जाणून घ्या. आम्ही शीखांनी तुमच्या माता-भगिनींना आक्रमणकर्त्यांपासून वाचवले होते, त्यावेळी शिख नसते तर तुमचे 12 वाजले असते. त्यामुळे अशी वक्तव्ये करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असे हरभजन सिंगने फटकारले आहे.