
राजकारण, वाद आणि बहिष्काराच्या सावलीत रंगलेल्या टी-20 विश्वचषकाची सुरुवात अखेर मैदानात होत असून पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात होणार आहे. हिंदुस्थानविरुद्धचा सामना न खेळण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तान आधीच दोन गुण आणि नेट रनरेटमध्ये पिछाडीवर असून, त्यामुळे प्रत्येक सामना त्यांच्या दृष्टीने करो वा मरोचा ठरला आहे. 17 वर्षांपासून विश्वचषक जिंकण्याची प्रतीक्षा असलेल्या पाकिस्तानसाठी एक चूकही त्यांचा खेळ संपवू शकते.
मात्र सध्या पाकिस्तान जबरदस्त
फॉर्ममध्ये आहे. गेल्या नऊ महिन्यांत 34 टी-20 सामने खेळत 24 विजय मिळवणाऱया पाकिस्तानने नुकताच ऑस्ट्रेलियाचा 3-0 असा धुव्वा उडवला. सलमान आगाच्या आक्रमक नेतृत्वाखाली फलंदाजीला धार आली आहे. नेदरलँड्सकडे संधी मर्यादित असल्या तरी कमी धावांचा सामना त्यांना अनुकूल ठरू शकतो. पाकिस्तानला धक्का देण्याचा इतिहास डच संघाकडे आहे, त्यामुळे ते सहज शरण जाणार नाहीत.
संभाव्य अंतिम संघ
पाकिस्तान ः साहिबजादा फरहान, सईम अय्यूब, सलमान आगा (कर्णधार), बाबर आझम, फखर झमान किंवा शादाब खान, उस्मान खान (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, शाहीन शाह आफ्रिदी, सलमान मिर्झा, उस्मान तारीक, अबरार अहमद.
नेदरलँड्स ः मायकेल लेविट, मॅक्स ओ’डॉड, कॉलिन ऍकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार, यष्टिरक्षक), बास डी लीडे, झॅक लायन-कॅशेट, लोगन व्हॅन बीक, रोलॉफ व्हॅन डर मर्व्ह, कायल क्लेन, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरन.


























































