आशिकाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या शिक्षकावर कारवाई करा, शिवसेनेने गौंड कुटुंबाची भेट घेऊन केले सांत्वन

शाळेत उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकाने पाठीवर दप्तर घेऊन तब्बल शंभर उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याची संतापजनक घटना वसईच्या हनुमंत विद्यामंदिर शाळेत घडली. यात चिमुकल्या आशिका गौंड या बारा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर सर्वत्र संतप्त पडसाद उमटत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. संबंधित शिक्षकांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने पोलीस आणि शिक्षण विभागाला दिला आहे.

सातिवली येथील कुवरा पाडा परिसरात हनुमंत विद्यामंदिर आहे. काजल गौंड उर्फ आशिका सहावीत शिकत होती. ८ नोव्हेंबरला शाळेत उशिराने आल्याने मुलांना शिक्षकाने पाठीवर दप्तर घेऊन १०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. यात आशिकाही होती. मात्र शाळेतून घरी परतल्यानंतर आशिकाची प्रकृती बिघडली, त्यामुळे तिला तातडीने वसईतील आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती आणखीनच खालावल्याने तिला मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेला टाळे ठोकले होते.

आशिकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
शनिवारी रात्री उशिरा आशिकावर शोकाकुल वातवरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे, उपजिल्हाप्रमुख दिलीप चेंदवणकर, जिल्हा प्रवक्ता राधेश्याम पाठक, शाखाप्रमुख दत्ता कदम, अरुण वाघमारे, रवी गावडे, रतिश राऊत, रोहित ससाने आदी उपस्थित होते.