घरकामगार ठेवताना पुरेशी काळजी घ्या! नागरिकांनी सावध राहण्याचे पोलिसांनी केले आवाहन

 मुले-मुली परदेशात स्थायिक झाल्यामुळे वृद्ध माता-पित्यांना एकाकी जीवन जगण्याची वेळ आली. पैसा प्रचंड असला तरी बोलणारे कोणी नाही. एकाकीपणा अक्षरशः खायला उठतो. पती-पत्नी दोघेही नोकरदार असल्यामुळे वृद्धांची देखभाल करण्यासाठी ते केअर टेकरचा आधार घेतात. मात्र, हे केअर टेकर किंवा घरकाम करणारेच काहीजण घातपात करत असल्याचे गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

घरकाम करणाऱ्या नोकरानेच ज्येष्ठ महिलेची नजर चुकवून घरातील 10 हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा 82 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 26 ते 27 सप्टेंबरला सिंहगड रस्त्यावरील रामा संस्कृती अपार्टमेंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी 65 वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आलिशान सोसायटीत तीन-चार बीएचकेचा प्लॅट किंवा रोहाऊस, महागडी कार घरात आधुनिक सोयीसुविधा, भारी फर्निचर आणि भरपूर बॅलन्स ही सध्या सुखाची व्याख्या बनली आहे. गरीब, निराधार असो किंवा पाच-सहा बेडरूमच्या भव्य बंगल्यामध्ये राहणारे एकाकी वृद्ध असो, सर्वांना याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. म्हातारपणाची काठी माणून जपलेली मुले, मुली कधीच वेगळी झाली. काहीजण करिअर घडविण्यासाठी दुसऱ्या शहर, राज्यात किंवा परदेशात गेली ती मुले तिकडेच स्थायिक आली. मी आणि माझे या दोनच शब्दांत सर्व व्यवहार सुरू आहेत. गेल्या काही वर्षांत एकत्र कुटुंबपद्धती नामशेष झाली आहे.

सायकलींचे, पेन्शनरांचे शहर असा एकेकाळी लौकिक असलेल्या पुण्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पती-पत्नी नोकरदार असल्यामुळे वृद्धांची देखभाल करण्यासाठी केअर टेकर नेमले जातात. मात्र, त्यांच्याकडूनच गुन्हे वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी केअर टेकर ठेवताना विशेष काळजी घ्यावी. नोंदणीकृत संस्थेकडूनच केअर टेकर व्यक्ती घ्यावी.

काळजी घ्या

घरकामगार नेमताना त्याची पूर्ण माहिती घ्या. त्याचे पूर्ण नाव, मूळ गाव, सध्याचा पत्ता आणि छायाचित्र घेऊन ठेवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

यापूर्वी एक्का टोळीचा पर्दाफाश

2021 मध्ये केअर टेकर म्हणून काम करताना चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले होते. औंध येथील वृद्ध दाम्पत्याला बाथरूममध्ये कोंडून 18 लाखांचा ऐवज चोरणाऱ्यांना चतुःशृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संदीप भगवान हांडे (वय 25, रा. संभाजीनगर), मंगेश बंडू गुंडे (वय 20, रा. बडीकाळ्या, जालना), राहुल कैलास बावणे (वय 22, रा. पीर कल्याण, जालना), विक्रम दीपक थापा ऊर्फ बिके (वय 19, रा. नाशिक), किशोर कल्याण चनघटे (वय 21, रा. संभाजीनगर), भो ऊर्फ कृष्णा किसन चव्हाण (वय 25, रा. संभाजीनगर) अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.