तमिळनाडूतील मासेमारीसाठी निश्चित करण्यात आलेल्या सागरी सीमा ओलांडून श्रीलंकेच्या सागरी सीमेत मासेमारी करणाऱ्या आठ मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
मच्छीमार सकाळी मासेमारी करता निघून गेले होते आणि धनुषकोडी आणि थलाईमन्नारजवळ मासेमारी करत असताना श्रीलंकेच्या नौदलाच्या गस्ती नौकांनी त्यांना घेरले. त्यांनी बोट अडवली आणि बोटीवरील आठ मच्छीमारांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या मच्छीमारांना मन्नार मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
‘काल, रामेश्वरममधून 430 यांत्रिक नौका मासेमारीसाठी समुद्रात गेल्या. त्यापैकी आठ सदस्यांसह एक बोट श्रीलंकेच्या नौदलाने पकडली’, अशी माहिती रामेश्वरमच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहाय्यक संचालकांनी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडल्याचे कारण दाखवत श्रीलंकेच्या नौदलाने 72 दिवसांत 163 मच्छीमारांना अटक केली आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक चर्चेनंतर अटक केलेल्या सर्व मच्छिमारांना तुकड्यांमध्ये सोडण्यात येत आहे.
अशा अटकेमुळे तमिळनाडूतील रामनाथपुरम, नागापट्टिनम आणि पुदुकोट्टई येथील मासेमारी उद्योगाला मोठा धक्का बसला असून श्रीलंका आणि हिंदुस्थान यांच्यातील राजनैतिक चर्चेद्वारे कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी मच्छीमार करत आहेत.