100 आलिशान गाड्या चोरल्या, एमबीए चोराचा ‘कार’नामा उघड

तामिळनाडू पोलिसांनी आलिशान कार चोरणाऱ्या चोराला अटक केली आहे. तो एमबीए पदवीधर असून निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा आहे. गेल्या 20 वर्षांपासून तो कार चोरी करून आलिशान जीवन जगत होता.

गेल्या महिन्यात चेन्नईतील अण्णा नगर येथे कार चोरीला गेली होती. अण्णा नगरमधील कथिरावन कॉलनीतील रहिवाशी एथिराज रथिनम यांनी घराच्या बाहेर त्यांची महागडी आलिशान कार पार्क केली होती. मात्र पहाटे त्यांची कार चोरीला गेली. पहाटे आलेल्या त्या चोराने अत्याधुनिक साधनांचा वापर करून कार पळवली होती. इतकी महागडी कार चोरीला गेल्याने एथिराज यांना धक्का बसला. त्यांनी तिरुमंगलम पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून चोराचा शोध सुरू केला. पोलिसांच्या तपासात संशयित पुद्दुचेरीमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून राजस्थानच्या सतेंद्र सिंह शेखावतला अटक केली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आणि पोलिसांना धक्काच बसला. सतेंद्र एमबीए पदवीधर आहे आणि त्याचे वडील निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. सतेंद्रला अटक झाल्यानंतर 10पेक्षा अधिक कार मालकांनी तिरुमंगलम पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे पोलीस ठाण्यात गदारोळ झाला.

गेल्या 20 वर्षांपासून सतेंद्र सिंह तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीसह अनेक राज्यांमधून आधुनिक उपकरणांचा वापर करून आलिशान गाड्या चोरत होता. चोरी केलेल्या या महागड्या कारची तो राजस्थान आणि नेपाळमध्ये विक्री करून पैसे कमवत होता. सतेंद्रने आतापर्यंत 100हून अधिक आलिशान गाड्या चोरल्या आहेत आणि त्या विकून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांमधून तो आलिशान जीवन जगत होता.