
सामना प्रतिनिधी । मुंबई
ताडदेव आरटीओमध्ये येत्या जानेवारीपर्यंत वाहनांच्या ब्रेक चाचणीसह फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आवश्यक असलेला ‘टेस्ट ट्रॅक’ बांधून पूर्ण होणार आहे. त्यामुळे मुंबईच्या व्यावसायिक वाहन चालकांचा पनवेलला जाण्याचा त्रास वाचणार आहे. वार्षिक फिटनेस सर्टिफिकेटसाठी मुंबईतील व्यावसायिक वाहन चालकांना सध्या पनवेलपर्यंत जावे लागत आहे. ताडदेव आरटीओमध्ये जानेवारीपर्यंत 250 मीटरचा टेस्ट ट्रॅक सुसज्ज होणार आहे. तर वडाळा आरटीओतील वाहनांची बेस्टच्या आणिक आगारात टेस्ट ट्रॅकची सुविधा एका आठवड्यात सुरू होणार आहे.
व्यावसायिक वाहनांना दरवर्षी वाहन योग्यता प्रमाणपत्र अर्थात ‘फिटनेस सर्टिफिकेट’ घेणे बंधनकारक असते. या सर्टिफिकेट शिवाय वाहन रस्त्यावर आल्यास त्यावर आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांकडून कारवाई करून दंड आकारला जातो. वाहनांच्या ब्रेक चाचणीसाठी आरटीओमध्ये 250 मीटरचा टेस्ट ट्रक आवश्यक असून मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरिवली या चार आरटीओत टेस्ट ट्रॅक उपलब्ध नसल्यामुळे व्यावसायिक वाहन चालकांची प्रतीक्षा यादी लांबली होती. मुंबई उच्च न्यायालयानेही यासंदर्भात आदेश देताना 250 मीटरचा ट्रक आवश्यक असल्याचे म्हटले होते.
1.40 कोटींची योजना
ताडदेव आरटीओत सध्या 160 मीटरचा टेस्ट ट्रॅक आहे. एक जुने बॅरेक तोडून ट्रॅक 90 मीटरने वाढविला जाणार आहे. याचे काम सुरू असून जानेवारी 2019 पर्यंत तो सेवेत येईल. त्याकरिता 1 कोटी 40 लाख रुपये खर्च येणार आहे. कायमस्वरूपी ट्रॅककरिता वडाळ्यातील शिवाजी नगर येथील जागेचा विचार सुरू आहे.


























































