
राज्यात महायुती सरकार स्थापन होऊन एक वर्ष झाले तरी रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद कायम आहे. अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. पालकमंत्री नाही, पण निदान 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्हा मुख्यालयात ध्वजवंदनाची संधी यंदा गोगावले यांना दिल्याने तटकरे यांना धक्का बसल्याची चर्चा आहे.
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणावरून दरवर्षी आदिती तटकरे व भरत गोगावले यांच्यात वाद उफाळून येतो. यापूर्वी आदिती तटकरे यांनाच रायगडमध्ये ध्वजवंदनाची संधी मिळाली आहे. त्यामुळे भरत गोगावले अस्वस्थ होत होते. त्यांनी यासंदर्भातील नाराजी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी मुख्यालयावर ध्वजारोहणाची संधी न मिळाल्याने त्यांनी रायगडमधील बिरवाडी ग्रामपंचायतीत जाऊन ध्वजारोहण केले होते. प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाचवेळी सकाळी सव्वानऊ वाजता आयोजित केला जातो. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत शिवाजी पार्क येथे ध्वजवंदन कार्यक्रम होईल.
नाशिकमध्ये महाजन करणार ध्वजवंदन
नाशिकमधील पालकमंत्री पदाचा वादही अद्याप कायम आहे. भाजपचे गिरीश महाजन व शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे हे दोघेही नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी फिल्डिंग लावून बसले आहेत. यावर अद्याप निर्णय झालेला नाही. पण नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजवंदन करतील, तर दादा भुसे यांच्यावर अमरावतीमधील ध्वजवंदनाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.

































































