
हिंदुस्थानातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढीची घोषणा केली आहे. या वेतनवाढीचा फायदा कनिष्ठ आणि मध्यम स्तरावरील, म्हणजेच सुमारे ८० टक्के कर्मचाऱ्यांना होणार आहे.
ही वेतनवाढ अशा वेळी होत आहे, जेव्हा टीसीएसने या वर्षी सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी (CHRO) मिलिंद लक्कड आणि CHRO पदावर नियुक्त असलेले के. सुदीप यांनी बुधवारी कर्मचाऱ्यांसाठी पाठवलेल्या ईमेलमध्ये सांगितले की, ही वेतनवाढ १ सप्टेंबरपासून लागू होईल.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार ईमेलमध्ये म्हटले आहे, ‘आम्ही C3A आणि समतुल्य श्रेणीतील पात्र असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ जाहीर करत आहोत, ज्यामध्ये आमच्या ८० टक्के कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही वाढ १ सप्टेंबर २०२५ पासून लागू होईल’.
ईमेलमध्ये पुढे म्हटले आहे, ‘आपण सर्वजण मिळून टीसीएसचे भविष्य घडवत आहोत, असे असताना तुमच्या समर्पण आणि प्रचंडबद्दल आम्ही प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो’. किती टक्के वेतनवाढ होणार हे मात्र अजून समजू शकले नाही.
यावर प्रतिक्रिया देताना, कंपनीने या वृत्ताला दुजोरा दिल्याचे इंग्रजी वृत्तवाहिनींच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. ‘१ सप्टेंबर २०२५ पासून आमच्या सुमारे ८० टक्के कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढ दिली जाईल’, असे निवेदनात म्हटले आहे. ही वेतनवाढ देऊन कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
TCS ने ‘भविष्यातील परिस्थितीचा अंदाज बांधून’ १२,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यासाठी तंत्रज्ञानातील गुंतवणूक, एआय (AI) चा वापर, बाजारपेठेचा विस्तार आणि कर्मचारी बळात बदल यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.
मागील महिन्यात जेव्हा कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या बातम्यांनी आयटी उद्योगात खळबळ उडवून दिली होती, तेव्हा कंपनीने म्हटले होते, ‘टीसीएस ‘भविष्यातील परिस्थितीसाठी सज्ज होणारी संस्था’ बनण्याच्या मार्गावर आहे. यात अनेक स्तरांवर धोरणात्मक उपक्रम राबवले जात आहेत, ज्यात नवीन-तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणूक, नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश, आमच्या ग्राहकांसाठी आणि स्वतःसाठी मोठ्या प्रमाणावर एआयचा वापर, भागीदारी अधिक दृढ करणे, पुढील पिढीसाठी पायाभूत सुविधा तयार करणे आणि आमच्या कर्मचारी बळात बदल करणे यांचा समावेश आहे.’
‘यानुसार, अनेक कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्याचे उपक्रम सुरू आहेत. या प्रवासाचा भाग म्हणून, ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे शक्य नाही, त्यांना आम्ही संस्थेतून कमी करत आहोत. यामुळे, वर्षाच्या काळात आमच्या एकूण जागतिक कर्मचारी संख्येपैकी सुमारे २ टक्के, प्रामुख्याने मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल’, असे TCS ने त्यावेळी सांगितले होते.
खरं तर, TCS मधील या कर्मचारी कपातीमुळे आयटी उद्योगातच मोठे बदल होणार आहेत का, यावर चर्चा सुरू झाली आहे. जागतिक स्तरावरील आर्थिक अनिश्चितता, अमेरिकेने लादलेल्या मोठ्या शुल्कांचा आउटसोर्सिंगवर होणारा परिणाम आणि एआयमुळे होणारे बदल यामुळे हा उद्योग मोठ्या उलथापालथीला सामोरे जात आहे.
या सर्व परिस्थितीत, हिंदुस्थानातील आघाडीच्या आयटी सेवा कंपन्यांनी आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत एक-अंकी महसूल वाढ नोंदवली आहे, कारण जागतिक आर्थिक अस्थिरता आणि भू-राजकीय तणावामुळे जागतिक तंत्रज्ञानाच्या मागणीवर परिणाम झाला आहे आणि ग्राहकांच्या निर्णयांमध्ये विलंब झाला आहे.