चंद्राबाबू नायडूंचा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार?

135

सामना ऑनलाईन, हैदराबाद

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी उघड संघर्ष सुरू केला होता. हेच चंद्राबाबू नायडू त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याची जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला खुद्द तेलगू देसम पक्षाच्याच माजी आमदाराने सुरू केली आहे. जे.सी.प्रभाकर रेड्डी असे या माजी आमदाराचे नाव असून त्यांनी दावा केला आहे की तेलगू देसम पक्ष हा भाजपमध्ये विलीन केला जाणार आहे.

रेड्डी यांनी अनंतपुरम इथे बोलताना म्हटले की ‘राजकारणात सदैव काळ कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणाचा शत्रू नसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चंद्राबाबू नायडू यांच्याकडे असलेल्या अनुभव आणि नव्या विचारांची आवश्यकता आहे.’ आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणूक झाली होती. या निवडणुकीमध्ये चंद्राबाबू नायडू यांची सत्ता गेली असून त्यांचे मुख्य राजकीय प्रतिस्पर्धी जगनमोहन रेड्डी यांची सत्ता आली आहे. पदभार स्वीकारताच जगनमोहन रेड्डी चंद्राबाबूंच्या मागे हात धुवून लागले आहेत. त्यांनी चंद्राबाबूंचा सीबीआयला आंध्र प्रदेशातील बंदीचा निर्णय उठवला आणि नंतर चंद्राबाबूंच्या बेकायदेशीररित्या बांधलेल्या घरावर हतोडा चालवला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडू यांनी मोदी सरकारच्या विरोधात मोर्चा उघडला होता. त्यांनी तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना फारसं यश आलं नाही. नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासोबत बैठका देखील केल्या होत्या. नॅशनल कॉन्फरन्सचे फरूख अब्दुल्ला यांनाही त्यांनी सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता. चंद्राबाबू नायडू यांनी ज्यांच्यासोबत हातमिळवणी केली होती, त्यातल्या एकालाही लोकसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळालं नाही. स्वत:नायडू यांनी आंध्र प्रदेशात सत्ता गमावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या