मुंबई महानगरपालिका खाजगी अनुदानित शाळांमधील रिक्त जागांवर शिक्षक, लिपिक आणि शिपाई वर्गाची नेमणूक करावी. शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना डी.सी.-1 योजना सुरू करावी. विमा योजना लागू करण्यात यावी. तसेच खासगी अनुदानित प्राथमिक शाळांसाठी अनुदान द्यावे, या मागन्यांसाठी आज महापालिका शिक्षणाधिकारी कार्यालयावर मुंबई महानगरपालिका शिक्षक / शिक्षकेतर सेनेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.
करी रोड येथील शिक्षणाधिकारी कार्यालयावर शिक्षक व कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक / शिक्षकेतर सेना अध्यक्ष के. पी. नाईक, मुख्य सरचिटणीस प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा निघाला. यावेळी शिक्षणाधिकारी राजू तडवी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अजय चौधरी यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. शिक्षक सेनेच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आयुक्तांबरोबर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन यावेळी तडवी यांनी दिले.
महानगरपालिका खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त जागांवर शिक्षक, लिपिक आणि शिपाई वर्गाची नेमणूक करावी. शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना डी.सी.-1 योजना सुरू करावी. विमा योजना लागू करण्यात यावी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना Grant In code तत्काळ लागू करावे. खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांसाठी अनुदान द्यावे. महानगरपालिका खासगी अनुदानित प्राथमिक शाळांना फॉर्म नं. 2 दिला जावा. खासगी अनुदानित शाळांची मान्यतेपूर्वीची रिकव्हरी न करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
अन्य काही मागण्या….
खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षकांना TSA 27 टक्के देय देणे.
खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांना विना विलंब परवानगी द्यावी.
मे 2008 रोजी नियुक्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावी.
खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील सन 2015 पासून कार्यरत असणाऱ्या टी.ई.टी शिक्षकांना कर्मचारी संकेतांक द्यावा.
मे 2008 नंतर महानगरपालिका सेवेत कामाला लागलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
शिक्षक कर्मचाऱ्यांचे दावे काही कारणामुळे प्रलंबित असल्यास त्यांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम तात्काळ द्यावी.
शिक्षक कर्मचाऱ्यांना 10,20,30 वेतन वृद्धीची आश्वासित योजना लागू करावी.