
वानखेडे स्टेडियमवर आज फटाक्यांची आतषबाजी नव्हती, पण धावांची आतषबाजी मात्र अशी झाली की, आकाशही दणाणून गेले. क्रिकेटच्या या रंगमंचावर संजू सॅमसन नावाच्या फलंदाजाने 89 धावांचा ज्वालामुखी उडवला आणि त्या लाह्यात इंग्लंडचा किल्ला वितळला. 254 धावांचे जबर आव्हान असूनही जेकब बेथेलच्या शतकी वादळाने हिंदुस्थानच्या आव्हानाला तडे दिले. शेवटच्या षटकापर्यंत धडधड आणि धाकधूक होती. अखेर उपांत्य फेरीच्या संघर्षात हिंदुस्थानने इंग्रजांना 7 धावांनी नमवत टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. आता तिसऱ्या जगज्जेतेपदापासून एक पाऊल दूर असलेल्या आणि जगज्जेतेपदाचा मुकुट राखण्यासाठी हिंदुस्थानला रविवारी न्यूझीलंडशी भिडावे लागणार आहे.
बेथेलने 43 चेंडूंत ठोकलेल्या शतकाने हिंदुस्थानी संघाची धाकधूक वाढवली. सामना इंग्लंड जिंकतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. तेव्हाच बुमराने टाकलेले 18 वे षटक आणि त्यानंतर हार्दिकच्या अचूक गोलंदाजीने हिंदुस्थानचा अंतिम फेरी प्रवेश निश्चित केला.


























































