‘महागुरु’पदी पुन्हा रवी शास्त्रीच, 2021 सालातील ट्वेण्टी-20 वर्ल्ड कपपर्यंत करार

277
ravi-shastri-bcci

गेल्या तीन वर्षांच्या कारकीर्दीत मुख्य प्रशिक्षक म्हणून मिळवलेले 70 टक्के यश आणि टीम इंडियातील क्रिकेटपटूंशी छान जुळलेले सूर या शिदोरीच्या बळावर रवी शास्त्री यांना पुन्हा तीन वर्षांसाठी संघाचे ‘महागुरू’ पद मिळाले आहे. माजी कर्णधार कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीने प्रशिक्षकपदाचा अनुभव, कारकीर्दीतील यशाचा आलेख, नव्या प्रशिक्षण तंत्रांचे ज्ञान आणि संघातील खेळांडूंशी जमलेले सूर या निकषांचा विचार करीत हिंदुस्थानी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माळ पुन्हा शास्त्रीच्या गळ्यात टाकली.

माजी क्रिकेटपटू कपिलदेव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने एक पत्रकार परिषद घेऊन शास्त्रीच्या फेरनियुक्तीची घोषणा केली. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत अनेकजण होते. त्यांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. समितीतील तिन्ही सदस्यांनी प्रशिक्षकपदाच्या स्पर्धेतील प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळे गुण दिले होते. त्यात शास्त्रीच्या पारडय़ात सर्वाधिक गुण पडल्याने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी त्यांचीच निवड करण्यात आली असल्याचे सल्लागार समितीचे कपिलदेव यांनी सांगितले.

हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांच्या नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने शुक्रवारी मुंबईत याची घोषणा केली. अनिल कुंबळे यांच्यानंतर 2017 साली मुख्य प्रशिक्षकपदावर रुजू झालेल्या रवी शास्त्राr यांना आता 2021 सालातील ट्वेण्टी-20 वर्ल्ड कपपर्यंत करारबद्ध करण्यात येणार आहे. हिंदुस्थानी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्राRसह माईक हेसन, टॉम मूडी, लालचंद राजपूत, रॉबिन सिंग व फिल सिमन्स या व्यक्तींनी अर्ज केला होता; मात्र फिल सिमन्स यांनी शुक्रवारी माघार घेतली. वर्ल्ड कपमधील अपयशानंतर रवी शास्त्राr यांना पदावरून काढून टाकण्यात येईल अशी चर्चा रंगू लागली होती. पण कपिल देव यांच्या समितीकडून पुन्हा एकदा त्यांची निवड करण्यात आली आहे. सल्लागार समितीने आपला निर्णय प्रशासकीय समितीला कळवला आहे. या निर्णयाला त्यांच्याकडूनही ग्रीन सिग्नल दाखवण्यात येईल हे निश्चित समजले जात आहे.

बीसीसीआयकडून ठेवण्यात आलेल्या सर्व निकषांच्या जोरावर आम्ही सर्वोत्तम तीन व्यक्ती निवडल्या. त्यामध्ये रवी शास्त्राr पहिल्या स्थानावर होते, ऑस्ट्रेलियाचे टॉम मूडी तिसऱया आणि न्यूझीलंडचे माईक हेसन दुसऱया स्थानावर राहिले, असे कपिल देव यावेळी म्हणाले.

आम्हाला ती सुविधा नव्हती – कपिल देव

विराट कोहलीचा रवी शास्त्री यांना पाठिंबा होता. पण आम्ही याबाबत त्याला विचारले नाही. असे असते तर संघातील सर्वच खेळाडूंची मते विचारात घ्यायला हवी होती. आम्हाला ती सुविधा नव्हती. कोणत्याही दबावाखाली आम्ही हा निर्णय घेतलेला नाही, असे कपिल देव यावेळी स्पष्टपणे म्हणाले.

म्हणून त्यांची निवड केली

रवी शास्त्राr यांना हिंदुस्थानी सिस्टम माहीत आहे. त्यांचे संघातील खेळाडूंशी सूर जुळले आहेत. दुसऱया कोणा व्यक्तीला इतक्या मोठय़ा पदावर नियुक्त केल्यास त्यांना सुरुवातीपासून सर्व बाबींना सुरुवात करावी लागेल. रवी शास्त्राr आम्हाला या पदासाठी योग्य वाटले, असे कपिल देव यांनी आवर्जून सांगितले.

या पदासाठी इच्छुक असलेल्या सर्व व्यक्तींनी आपआपले प्रेझेंटेशन आमच्यासमोर ठेवले. यामध्ये प्रशिक्षक गुणवत्ता, अनुभव, खेळाडूंशी समन्वय यासह इतर बाबींचा समावेश होता. प्रशिक्षक निवडण्यासाठी आमचाही कस लागला. कारण सर्वांचेच प्रेझेंटेशन चांगले होते. या पदासाठी चुरस लागली होती, असे कपिल देव यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या