
रविवारी जगज्जेतेपद राखणाऱ्या हिंदुस्थानी खेळाडूंवर बीसीसीआये 131 कोटी रुपयांचा धनवर्षाव केला असला तरी 43 वर्षांपूर्वी पहिलावहिला वर्ल्ड कप (प्रुडेन्शियल कप) जिंकणाऱ्या कपिलदेवच्या शूरवीरांच्या सन्मानासाठी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना संगीत सोहळा आयोजित करावा लागला होता. त्या कार्यक्रमात मोठा निधी गोळा व्हावा म्हणून देशवासीयांनाही धडपड करावी लागली होती आणि या संगीत सोहळ्यातून उभ्या राहिलेल्या रकमेतून जगज्जेत्यांना प्रत्येकी एक लाखाचा रोख पुरस्कार दिला गेला होता. त्या लाखमोलाच्या पुरस्काराची आठवण येताच आजही हिंदुस्थानी जगज्जेत्यांचे डोळे पाणावतात.
1983 च्या त्या पावसाळी संध्याकाळी लॉर्ड्सच्या बाल्कनीत हिंदुस्थानी संघाने आपला पहिला विश्वचषक उंचावला आणि क्रिकेटचा इतिहास एका क्षणात बदलला. कपिलदेवच्या हातात चमकणारी ती ट्रॉफी म्हणजे फक्त चषक नव्हता. ती एका स्वप्नाची पहाट होती. पण त्या सुवर्णक्षणामागे एक विचित्र, थोडंसं माला टोचणारं वास्तव दडलेलं होतं. जग जिंकून परतलेल्या त्या वीरांसाठी आपल्या देशात रोख बक्षिसाचीही कोणतीही व्यवस्था नव्हती, तरतूद नव्हती. त्या काळी बीसीसीआय आतासारखे सोन्याच्या खाणीवर बसलेले नव्हते. तेव्हा पैसा कमी होता, पण भावना अफाट होत्या. तेव्हा देशभरात एकच भावना उसळली की जग जिंकून आलेल्या या मुलांचा सन्मान व्हायलाच हवा. येथूनच विजेत्यांसाठी गौरवनिधी संकलनाचा कार्यक्रम आयोजित करण्याची कल्पना समोर आली. तेव्हा राजसिंग डुंगरपूर यांच्या विनंतीला मान देत लतादीदींनी गौरवनिधी संगीत सोहळय़ाला होकार कळवला
दीदींच्या स्वरांतून उभारला मानाचा निधी
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी दिल्लीत संगीत सोहळय़ाच्या आयोजनाची जबाबदारी घेतली आणि त्या मैफलीतून मिळणारा प्रत्येक पैसा विश्वविजेत्या हिंदुस्थानी संघाला देण्यात येणार असल्याचे सांगितले. लतादीदींनी त्या कार्यक्रमासाठी एक पैसाही मानधन घेतले नाही. त्या रात्री दिल्लीतील सभागृहात केवळ गाणी नव्हती; त्या स्वरांमध्ये देशाचा अभिमान होता, कृतज्ञतेचा हुंकार होता. प्रेक्षकांच्या टाळय़ा म्हणजे जणू विश्वविजेत्या संघाला दिलेला सलामच होता. त्या मैफलीतून सुमारे वीस लाख रुपयांचा निधी जमा झाला.
प्रत्येक खेळाडूला एक लाखाचा मान
त्या निधीतून कपिलदेवच्या विश्वविजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला एक लाख रुपये देण्यात आले. आजच्या काळात ती रक्कम कदाचित छोटी वाटेल, पण त्या काळात ते केवळ पैसे नव्हते. तो सन्मान होता, देशाच्या प्रेमाचा ठेवा होता.
ट्रॉफीपेक्षा मोठा ठरलेला क्षण
1983 चा विश्वचषक हा फक्त क्रिकेटचा विजय नव्हता; तो हिंदुस्थानच्या आत्मविश्वासाचा जन्म होता आणि त्या विजयाला लतादीदींच्या स्वरांनी दिलेली साथ आजही क्रिकेटच्या इतिहासात एक भावनिक अध्याय म्हणून जिवंत आहे. त्या दिवशी फक्त एक संघ सन्मानित झाला नाही, संपूर्ण देशाने आपल्या विश्वविजेत्या मुलांना प्रेमाने मिठी मारली.
बक्षिसाच्या रकमेची एक लाखावरून पाच कोटींपर्यंत झेप
1983 नंतर थेट 2007 साली म्हणजे तब्बल 24 वर्षांनंतर हिंदुस्थानने प्रथमच आयसीसीची स्पर्धा जिंकली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या पहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानने बाजी मारताच त्यांच्यावर रोख पुरस्कारांचा वर्षाव झाला होता. तेव्हा बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी 80 लाख रुपये दिले होते. तसेच सहकारी स्टाफलाही वेगळा बोनस दिला होता. त्यानंतर 2011 साली धोनीच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. तेव्हा बीसीसीआयने छप्पर फाडके पुरस्कार जाहीर करत प्रत्येक खेळाडूवर 2 कोटी, सपोर्ट स्टाफला 50 लाख आणि निवड समितीला 25 लाख रुपये जाहीर केले होते. 2013 साली धोनीनेच चॅम्पियन्स करंडक जिंकला आणि पुन्हा एकदा सारे खेळाडू कोटय़धीश झाले. त्यानंतर 2024 साली रोहित शर्माने जगज्जेतेपदाचा मान मिळवला. या जेतेपदापर्यंत बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत संघटना बनली होती आणि या श्रीमंत संघटनेने 125 कोटी रुपयांचे इनाम जाहीर करून नवा इतिहासही रचला होता. तेव्हा जगज्जेत्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळाले होते. तसेच प्रत्येक खेळाडूला त्यांच्या राज्य शासनानेही कोटय़वधींचा पुरस्कार जाहीर केला होता.





























































