हिंदुस्थान-बांगलादेश दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिले तीन दिवस खेळापेक्षा पावसाचीच बॅटिंग बघायला मिळाली होती. मात्र, कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सोमवारी चौथ्या दिवशी ‘टीम इंडिया’ने विक्रमांचा पाऊस पाडला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वेगवान 50, 100, 150, 200 अन् 250 धावा फटकावण्याचा विक्रम ‘टीम इंडिया’ने या एकाच कसोटीत केला. पावसामुळे कानपूर कसोटी अनिर्णित राहण्याची चिन्हे असताना, रोहित शर्माच्या सेनेने टी-20 शैलीत फलंदाजी केल्याने ही कसोटी आता अचानक रंगतदार अवस्थेकडे झुकली आहे.
बांगलादेशला चौथ्या दिवशी 233 धावांवर रोखल्यानंतर ‘टीम इंडिया’ने 34.4 षटकांत 9 बाद 285 धावा चोपून काढत पहिल्या डावात 52 धावांची आघाडी घेत कसोटीत रंगत निर्माण केली. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशची उर्वरित 11 षटकांच्या खेळात 2 बाद 26 अशी दुर्दशा झाली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सदमान इस्लाम 7, तर मोमिनुल हक शून्यावर खेळत होते.
431 धावा आणि 18 विकेट
आज एकाच दिवशी अनेक विक्रमांचा पाऊस पडला. आधी 3 बाद 107 धावांवरून खेळ सुरू करणारा बांगलादेश 233 धावांवर आटोपला. म्हणजेच 126 धावांत त्यांनी 7 फलंदाज गमावले. मग हिंदुस्थानने 9 बाद 285 धावांवर आपला डाव घोषित केला. त्यानंतर अश्विनने बांगलादेशच्या झाकीर हसन आणि हसन मेहमूदला बाद करत 2 बाद 26 अशी केविलवाणी अवस्था केली. याचाच अर्थ आज दिवसभरात 431 धावांच्या मोबदल्यात तीन डावांतील 18 फलंदाज बाद झाले. बांगलादेशने 50.2 षटकांत 152 धावांत आपले 9 फलंदाज गमावले, तर हिंदुस्थानने 34.4 षटकांत 9 विकेटच्या जोरावर 8.22 धावांच्या सरासरीने चक्क 285 धावा ठोकल्या.
बांगलादेशच्या पहिल्या डावात 233 धावा
दरम्यान, बांगलादेशने पहिल्या दिवसाच्या 3 बाद 107 धावसंख्येवरून सोमवारी चौथ्या दिवशी पुढे खेळायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी 40 धावांवर नाबाद राहिलेल्या मोमिनुल हकने आजही हिंदुस्थानी गोलंदाजीचा प्रतिकार केला. मेहदी हसनने 20 धावा करीत त्याला साथ दिली. मोमिनूलने 194 चेंडूंत 17 चौकार व एका षटकारासह आपली नाबाद 107 धावांची खेळी सजविली. 74.2 षटकांत 233 धावांवर बांगलादेशचा पहिला डाव संपुष्टात आला. हिंदुस्थानकडून जसप्रीत बुमराहने 3, तर मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन व आकाश दीप यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले. रवींद्र जाडेजाला एक बळी मिळाला.
एक डाव अनेक विक्रम
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वेगवान अर्धशतक, वेगवान शतक, वेगवान दीडशतक, वेगवान द्विशतक आणि वेगवान अडीच शतकी धावसंख्या ठोकण्याचा विश्वविक्रम एकाच म्हणजे कानपूर कसोटीत केला. याआधी, कसोटी क्रिकेटमध्ये धावफलकावर वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता. वेस्ट इंडीजविरुद्ध 4.2 षटकांत त्यांनी हा विक्रम केला होता. वेगवान शंभर धावांचा विक्रम तर हिंदुस्थानच्याच नावावर होता. त्यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध 12.2 षटकांत शतकी धावसंख्या गाठली होती.
आता हिंदुस्थानने 10.1 षटकांतच धावफलकावर शतक लावले. ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीत पाकिस्तानविरुद्ध 28.1 षटकांत द्विशतकी धावसंख्या गाठण्याचा पराक्रम केला होता. हिंदुस्थानने आज 24.2 षटकांतच द्विशतक पूर्ण केले. याचबरोबर ‘टीम इंडिया’ने 18.2 षटकांत वेगवान दीडशतक, तर 30.1 षटकांत वेगवान 250 धावसंख्या उभारण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केलाय.
रोहित शर्माचा नवा विक्रम
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकणारा रोहित शर्मा हा पहिला सलामीवीर ठरला आहे. मात्र, खेळाडू म्हणून अशी कामगिरी करणारा तो फलंदाज होय. हा पराक्रम सर्वप्रथम फोफी विल्यम्सने 1948 मध्ये केला होता. यानंतर 2013 मध्ये सचिनने पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले. उमेश यादवही या यादीत आहे. त्याने 2019 मध्ये पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले. मात्र, कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकण्याचा पराक्रम केलाय.
तीन षटकांत अर्धशतक
पावसामुळे अडीच दिवसांचा खेळ पाण्यात गेल्याने आता कानपूर कसोटी अनिर्णित राहणार अशीच चर्चा सुरू होती. मात्र, कर्णधार रोहित शर्मा व यशस्वी जैसवाल यांनी टी-20 शैलीत फलंदाजी सुरू करीत आपले इरादे स्पष्ट केले. जैस्वालने पहिल्या षटकात तीन सणसणीत चौकार लगावले, तर रोहितने पुढच्या षटकात दोन षटकार ठोकून अभियान सुरू केले. रोहित-जैस्वालने या दोघांनी 3 षटकांतच 51 धावांची विक्रमी सलामी दिली. 11 चेंडूंत 3 षटकार व एका चौकारासह 23 धावा करणाऱ्या रोहितचा मेहदी हसनने चौथ्या षटकात त्रिफळा उडवून बांगलादेशला पहिले यश मिळवून दिले.
जैसवाल, राहुलचे अर्धशतक
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर यशस्वीच्या साथीला शुभमन गिल आला. गिलनेही 36 चेंडूंत 39 धावांची खेळी केली. त्याआधी, जैसवालने 51 चेंडूंत 12 चौकार व 2 षटकारांसह धडाकेबाज 72 धावा ठोकल्या. हसन महमूदने त्रिफळा उडवून त्याचा झंझावात थांबविला. नंतर ऋषभ पंतही 9 धावा करून माघारी परतला. शाकिब अल हसनने त्याला महमूदकरवी झेलबाद केले. यानंतर विराट कोहली आणि लोकेश राहुल ही जोडी जमली. या दोघांनीही 43 चेंडूंत 68 धावा फटकावल्या.
विराटने 35 चेंडूंत 47 धावा, तर लोकेश राहुलने 43 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 68 धावा ठोकल्या. शाकिबने कोहलीचा त्रिफळा उडवून त्याला अर्धशतकापासून वंचित ठेवले. रवींद्र जाडेजा (8), रविचंद्रन अश्विन (1) ही अष्टपैलू जोडी अपयशी ठरली, नाहीतर ‘टीम इंडिया’ने लवकरच तीनशेपार धावा केल्या असत्या. राहुल व आकाश दीप (12) 35व्या षटकात बाद झाल्याने हिंदुस्थानने 285 धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. बांगलादेशकडून शाकिब अल हसन व मेहदी हसन यांनी 4-4 फलंदाज बाद केले, तर हसन महमूदने एक विकेट टिपला.