बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसेसमध्ये तांत्रिक दोष; शिवसेनेने प्रशासनाचे वेधले लक्ष, महाव्यवस्थापकांनी मागवला अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांच्या सेवेत धावणाऱ्या बेस्टच्या भाडेतत्त्वावरील बसेसमध्ये तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असल्याचे शिवसेनेने बेस्ट प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची गंभीर दखल घेत बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी बसमधील तांत्रिक दोषाचा शोध घेण्यासाठी तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश वाहतूक विभागाला दिले आहेत. तसेच वाहतूक विभागाकडे चौकशीचा सविस्तर अहवाल आठवडाभरात मागवला आहे.

शिवसेना उपनेते, बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनी बेस्टच्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील बसेसबाबत प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यांनी बसेसमधील तांत्रिक दोषासंबंधी विविध पुरावेदेखील सादर केले होते. त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल बेस्ट महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी घेतली आहे. बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावरील बस संबंधित आगारातील अभियांत्रिकी विभागामार्फत तपासण्यात येतात. असे असतानाही तांत्रिकदृष्टय़ा नादुरुस्त असलेल्या बस प्रवासी सेवेत रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक बाब नितीन नांदगावकर यांनी निदर्शनास आणली. दोन खासगी बस कंत्राटदारांशी संबंधित दोषांची माहिती त्यांनी दिली. रस्त्यावर स्टिअरिंग लॉकच्या समस्या, ब्रेक निकामी होणे, ब्रेक लाइनरच्या समस्या, गाडय़ांची दुर्दशा, सुरक्षा उपायांचा अभाव आणि अपुरी देखभाल अशा विविध मुद्दय़ांकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. काही बसची योग्य दुरुस्ती न करताच केवळ कागदोपत्री त्या बस दुरुस्त झाल्याचे दाखवून पुन्हा सेवेत दाखल केल्या जात असल्याचा आरोप नांदगावकर यांनी केला.

प्रवाशांच्या जीविताला धोका

बेस्टच्या भाडेतत्त्वावरील अनेक बसेस तांत्रिक दोषांमुळे धोकादायक बनल्या आहेत. मात्र तशा स्थितीतही त्या बस चालवण्यासाठी चालकांवर दबाव टाकण्यात येत आहे. अशा प्रकारांमुळे अपघात होऊन प्रवाशांच्या जीविताला धोका संभावत आहे.