सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि पैसे मिळवण्यासाठी आता अनेक जण कोणताही मार्ग अवलंबत आहेत. यात तेलंगणातील सिरिल्ला येथील एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्याची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. हिंदू संस्कृतीत पवित्र मानला जाणारा आणि हिंदुस्थानचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मोराची ओळख आहे. एका युट्यूबरने मोराची करी बनवली आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर नेटकऱ्यांनी तक्रार केली अखेर त्या युट्यूबरला अटक करण्यात आली आहे. या यूट्यूबरने त्याच्या चॅनलवर मोराची करी बनवतानाचा व्हिडीओ अपलोड केला होता. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मिळतात त्या युट्यूबर तात्काळ कारवाई केली आहे.
प्रणय कुमार असे त्या युट्यूबरचे नाव आहे. प्रणय कुमार गेल्या अनेक महिन्यांपासून युट्यूब चॅनल चालवत आहे. प्रणय कुमारने त्यांच्या चॅनलवर मोराची करी कशी बनवायची याच्या रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला होता. दरम्यान त्याचा हा व्हिडीओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला. त्याच्यावर बेकायदेशीरपणे वन्यप्राण्यांची हत्या केल्याचा आरोप केला असून हा व्हिडीओ कुमारच्या युट्यूब चॅनलवरून काढून टाकण्यात आला होता. तसेच पोलिसांतही प्रणय कुमारच्या विरोधात तक्रार दाखल केली.
सिरिल्लाचे पोलीस अधीक्षक (एसपी) अखिल महाजन यांनी तात्काळ या प्रकरणात युट्यूबर प्रणय कुमारला अटक केली आहे. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. त्यामुळे त्याची अशा प्रकारे हत्या करणे हा एक मोठा गुन्हा आहे. त्यामुळे संबंधित कलमांतर्गत कुमारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच फक्त कुमारवरच नाही तर प्राणी- पक्षांची अशा प्रकारे हत्या करणाऱ्या इतरही लोकांवर मोठी कारवाई केली जाईल असे अखिल महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या वन अधिकारी या प्रकरणाची कसून चोकशी करत असून फॉरेन्सिक विश्लेषणासाठी नमूने गोळा करत असल्याचेही अखिल महाजन यांनी सांगितले आहे. तसेच आम्ही कुमारच्या रक्ताचे नमुने आणि करीचा काही भाग चाचणीसाठी पाठवला आहे. जर चाचणीत मोराचे मांस पॉझिटिव्ह आल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.