ओव्हरटेकच्या नादात भरधाव बसने पिकअप वाहनाला धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये घडली. या अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 27 जण जखमी झाले आहेत. बुडौन-मेरठ राज्य महामार्गावर हा अपघात घडला. जखमींना तात्काळ उपचारासाठी बुलंदशहर, मेरठ आणि अलीगढ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे.
गाझियाबादमधील एका कंपनीत काम करणारे कामगार पिकअप वाहनाने रक्षाबंधनासाठी अलीगढजवळील त्यांच्या मूळ गावी चालले होते. मात्र रक्षाबंधन साजरा करण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. जिल्हाधिकारी चंद्रप्रकाश सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअप व्हॅन गाझियाबादहून संभलकडे चालली होती. भरधाव वेगात असलेल्या खासगी बसने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पिकअप व्हॅनला धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात पिकअप व्हॅनचा चक्काचूर झाला तर बसच्या पुढच्या भागाचेही नुकसान झाले आहे.