
भाडेकरार संपल्यावरही भाडेकरू घर सोडायला तयार नसेल तर काय करावे, हे सूचत नाही. अनेकदा घरमालक त्रस्त होतो. घाबरून जातो. अशा वेळी कायदेशीर पावले उचलणे आवश्यक आहे.
कायदेशीरदृष्टय़ा निश्चित मुदतीचा भाडे करार संपतो तेव्हा भाडेकरूचा मालमत्तेवरील ताबा संपतो. अशा स्थितीत नवीन करार झाला नाही तर भाडेकरू अनधिकृत मानला जाऊ शकतो.
याचा अर्थ घरमालक मनमानी करू शकतो असे नाही. वीज किंवा पाणीपुरवठा खंडित करणे, कुलूप बदलणे किंवा भाडेकरूला जबरदस्तीने बाहेर काढणे बेकायदेशीर आहे. असे केल्याने घरमालकाविरुद्ध फौजदारी गुन्हेदेखील दाखल होऊ शकतात.
अशा प्रकरणांमध्ये सर्वात पहिले म्हणजे वकिलामार्फत औपचारिक कायदेशीर नोटीस पाठवा. या नोटीसमध्ये भाडेकरार संपला आहे आणि भाडेकरूने वाजवी वेळेत, साधारणपणे 15-30 दिवसांच्या आत मालमत्ता रिकामी करण्याचे स्पष्ट नमूद करा.
कधीकधी कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर भाडेकरू मालमत्ता रिकामी करतात. नोटीसमध्ये जास्त काळ राहिल्याबद्दल भरपाई किंवा नुकसानभरपाईची मागणीदेखील करू शकता. भाडेकरार संपल्यावर भाडे स्वीकारू नका.

































































