पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी 23 लोकांना ठार मारले आहे. पाकिस्तानमध्ये सोमवारी बंदुकधाऱ्यांनी 23 लोकांना बळजबरीने वाहनातून उतरवून गोळ्या झाडल्या आहेत, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
AFP च्या वृत्तानुसार, दहशतवाद्यांनी बलुचिस्तान प्रांतातील मुसाखेल जिल्ह्यातील अनेक बस, ट्रक आणि व्हॅनला रोखले. दहशतवाद्यांनी लोकांच्या जातीची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेत 23 जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले आहेत. मुसाखेलचे वरिष्ठ अधिकारी नजीबुल्लाह काकर यांनी सांगितले की, पंजाबला बलुचिस्तानला जोडणाऱ्या महामार्गावर दहशतवाद्यांनी अनेक बस, ट्रक आणि व्हॅन रोखल्या आहेत. पंजाबहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली आणि पंजाबहून आलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांना गोळी मारण्यात आली आहे.
पाकिस्तानचे वर्तमानपत्र डॉनच्या वृत्तानुसार, सहाय्यक आयुक्त नजीब काकर यांनी सांगितले की, बंदूकधारी लोकांनी मुसाखेल येथील महामार्गावर गाड्या थांबवून प्रवाशांना उतरविले. त्यांनी 10 गाड्यांना आग लावली. या घटनेनंतर बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी एक निवेदन जारी केले, त्यांनी या दहशतवादी हल्ल्याचा कडक शब्दात निषेध केला. दहशतवाद्यांच्या या भ्याड कृत्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. बलुचिस्तान सरकार दोषींना कठोर शिक्षा देईल.