
जम्मू-कश्मीरच्या बांदीपोरा जिह्यात गुरेज सेक्टर येथे नियंत्रणरेषेजवळ सुरक्षा दलाच्या जवानांनी ह्यूमन जीपीएस म्हणून ओळखला जाणारा दहशतवादी बागू खान याचा खात्मा केला. बागू खान हा समंदर चाचा म्हणूनही ओळखला जायचा. अधिकाऱ्यांच्या हाती त्याचे ओळखपत्र लागले आहे.
बागू खान 1995 पासून पाकव्याप्त कश्मीरमध्ये राहत होता. 25 वर्षांपासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. आतापर्यंत घडलेल्या 100 हून अधिक घुसखोरीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. बागू खानला जम्मू-कश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचे सर्व रस्ते माहीत होते. तसेच पकडले गेल्यानंतर कशी सुटका करून घ्यायची हेदेखील त्याला माहीत होते. त्यामुळे त्याला ह्यूमन जीपीएस असे नाव देण्यात आले होते. दरम्यान, 1 ऑगस्टपासून आतापर्यंत तब्बल सहा वेळा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे.
सुरक्षा दलांच्या यादीत मोस्ट वाँटेड
बागू खान सुरक्षा दलांच्या यादीत तो हिजबुल मुजाहिदीनचा मोस्ट वाँटेड दहशतवादी होता. 28 ऑगस्ट रोजी लष्कर आणि जम्मू-कश्मीर पोलीस तसेच बागू खानसोबत गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी होत असताना चकमक उडाली. यावेळी बागू खान आणि त्याच्या साथीदाराने अंदाधुंद गोळीबार केला. त्याला चोख प्रत्युत्तर देत सुरक्षा दलांनी दोघांचाही खात्मा केला. दोघांचे मृतदेहदेखील हाती लागले आहेत.
अशी उडाली चकमक
बागू खान आणि त्याच्या साथीदारासोबत कशाप्रकारे चकमक उडाली याबाबत हिंदुस्थानी लष्कराने एक्सवरून माहिती दिली आहे. दहशवाद्यांच्या घुसखोरीबद्दल गुप्तचर संस्थांकडून लष्कर आणि जम्मू-कश्मीर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्याआधारावर दहशतवाद्यांची संयुक्त शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. यादरम्यान दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देत सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. त्यात बागू खान आणि त्याच्या साथीदाराचा खात्मा झाला.
अमृतसरमध्ये चार दहशतवाद्यांना अटक
अमृतसरमध्ये आज पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दहशतवादी करणदीप सिंग याच्या पायात गोळी घुसून तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार दहशतवाद्यांना काडतुसे आणि शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आली. करणदीपसह गुरसेवक, अमृतपाल, अर्शदीप आणि आणखी एका अल्पवयीनाला अटक करण्यात आली. परदेशात बसलेला हस्तक लखबीर लंडा याच्या सांगण्यावरून हे दहशतवादी टार्गेट किलिंग करत होते. अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली.