कश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांना मोठे यश, हिजबुल कमांडर मसूदसह 3 दहशतवादी ठार

323

जम्मू-कश्मीरमध्ये लष्कराच्या दहशतवाद सफाई मोहिमेला मोठे यश लाभत आहे. कश्मीर खोऱ्यातील अनंतनाग जिह्यात खुलचोहर भागात सोमवारी सकाळी जम्मू-कश्मीर पोलीस आणि हिंदुस्थानी लष्कराने केलेल्या धडक कारवाईत हिजबुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर मसूद अहमद भट यांच्यासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मसूद दोडा जिल्ह्याचा शेवटचा दहशतवादी असल्याने दोडा आता दहशतमुक्त झाल्याची घोषणा लष्कराने केली आहे.

दक्षिण कश्मीरच्या अनंतनग जिह्यातील खूलचोहर भागात दहशतवादी लपल्याची खबर मिळताच अनंतनाग पोलीस आणि हिंदुस्थानी लष्कराने जोरदार तपास मोहीम राबवली. या मोहिमेत दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा बलांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यात हिजबुल कमांडर मसूदसह लष्कर ए तोयबाचे 2 दहशतवादीही ठार झाले. पोलिसांनी या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून 1 ए के 47 रायफल, दोन पिस्तुले आणि दारुगोळा जप्त केला, अशी माहिती जम्मू-कश्मिरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली. हिजबुलमध्ये सामील झालेला मसूद भट हा जम्मूच्या दोडा जिह्यातील अखेरचा कडवा अतिरेकी होता. त्याच्यावर दोडा पोलिसांत बलात्कारासह अनेक गंभीर गुह्यांची नोंद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या