
टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांना आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज मिळणार आहे. टेस्लाच्या शेअरहोल्डर्सनी 1 ट्रिलियन म्हणजेच जवळपास 83 लाख कोटी रुपयांच्या वार्षिक पॅकेजला मंजुरी दिली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे मस्क हे जगातील पहिले ट्रिलियनेअर बनण्याच्या शर्यतीत सामील झाले आहेत. कंपनीची बैठक पार पडली. या बैठकीत 75 टक्क्यांपेक्षा भागधारकांनी पॅकेजच्या बाजूने मतदान केले.
टेस्ला कंपनीने मस्क यांना आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज जाहीर केले असले तर त्यांच्यासमोर 12 नवीन टार्गेट ठेवले आहेत. यामध्ये टेस्लाचे बाजारमूल्य 2 ट्रिलियन म्हणजेच 177 लाख कोटींपर्यंत वाढवणे, पुढील 10 वर्षांत 20 मिलियन कार वितरित करणे, कंपनीचा ऑपरेटिंग नफा तिप्पट करणे आणि 10 लाख रोबोटिक टॅक्सी विकसित करणे, असे चार महत्त्वाचे टार्गेट आहेत. जर मस्क यांनी ही उद्दिष्टे साध्य केली तर ते जगातील पहिले ट्रिलियनेअर बनू शकतात. मस्क हे 500 अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठणारे जगातील पहिले व्यक्ती बनले. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, 1 ऑक्टोबर रोजी अमेरिकन बाजार बंद झाला तेव्हा इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती 500 अब्ज डॉलर्स 44.33 लाख कोटींपर्यंत पोहोचली. गेल्या 10 वर्षांत मस्क यांची संपत्ती 34 पटीने वाढली आहे.
स्टेजवर डान्स करत आभार मानले
टेस्लाच्या बैठकीत भागधारकांनी मस्क यांच्या सर्वात मोठ्या पॅकेजला मंजुरी दिल्यानंतर मस्क सर्वात आधी स्टेजवर आले. सर्वांचे आभार मानले आणि थेट नाचून आनंद व्यक्त केला. या वेळी बोलताना मस्क म्हणाले की, आम्ही आता टेस्लाच्या भविष्यातील केवळ एक नवीन अध्याय सुरू करत नाही, तर एक नवीन पुस्तक सुरू करत आहोत. मस्क यांच्या पॅकेजच्या घोषणेनंतर टेस्लाच्या शेअर्समध्ये 1.8 टक्के वाढ झाली. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 14 टक्के वाढ झाली आहे. टेस्लाचे मार्केट कॅप अंदाजे 1.4 ट्रिलियन अर्थात 120 लाख कोटी रुपये आहे.

























































