थायलंडची ओपल सुचाता चुआंगस्त्री बनली ‘विश्वसुंदरी’

हैदराबाद येथील हिटेक्स प्रदर्शनी केंद्रात रंगलेल्या 72 व्या ’मिस वर्ल्ड 2025’ च्या स्पर्धेत अखेर थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगस्री हिने ’विश्वसुंदरी’चा मुकुट पटकावला. मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकणारी ती पहिली थायलंडची महिला ठरली आहे. याआधी तिने मिस युनिव्हर्स थायलंड 2024 चा किताब पटकावला होता. गतवर्षीची विश्वसुंदरी क्रिस्टिना पिस्जकोवा हिने मिस वर्ल्डचा मुकुट ओपल सुचाताच्या डोक्यावर ठेवला.

इथिओपियाच्या हसेट देरेजे एडमासूला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मिस पोलंडला तिसरे तर मिस मार्टिनिकला चौथे स्थान मिळाले. हिंदुस्थानच्या नंदिनी गुप्ता हिने सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले होते. परंतु, तिला अंतिम फेरीत धडक मारण्यात अपयश आले. तिला टॉप 5 मध्ये स्थान मिळवता न आल्याने ती स्पर्धेतून बाहेर पडली. या स्पर्धेत एकूण 108 सौंदर्यवतींनी भाग घेतला होता. मिस वर्ल्ड स्पर्धेवेळी प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद, चिरंजीवी, ईशान खट्टर, राणा दग्गुबत्तीसह अनेक बडे कलाकार यावेळी उपस्थित होते.