
ठाणे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांच्या उपचारासाठी एकमेव असलेले ठाण्याचे सुपर स्पेशालिटी सिव्हिल हॉस्पिटलचे दोन महिन्यात लोकार्पण होणार आहे. रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून जवळपास 90 टक्के पूर्ण झाले आहे. या रुग्णालयामुळे सहा महानगरपालिका, दोन नगर परिषद व दोन नगरपंचायत महानगर हद्दीतील नागरिकांबरोबरच दुर्गम भागातील टोकावडे, मुरबाड, शहापूर तालुका व ठाणे जिल्ह्यातील तसेच लगतच्या पालघर जिल्ह्यातील गरजू रुग्णाला फायदा होणार आहे.
अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळावे यासाठी मुंबईकडे रवाना करावे लागते. त्यामुळे ठाण्यात सिव्हिल हॉस्पिटलचे सुपर स्पेशालिटीमध्ये रूपांतर करण्यात आले असून सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध होणार आहेत. सार्वजनिक आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामस्थळास भेट देऊन पाहणी केली. इमारतीचे बांधकामाचे क्षेत्रफळ 92 हजार 539 चौरस मीटर आहे. रुग्णालयात 900 खाटांची क्षमता असून त्यात 500 खाटांचे सामान्य रुग्णालय, 200 खाटांचे महिला-बालरुग्णालय आणि 200 खाटांचे सेवा रुग्णालय तसेच हेलिपॅड, परिचारिका प्रशिक्षण केंद्र, वसतिगृह, पार्किंग आणि अत्याधुनिक आयसीयू सुविधा उपलब्ध असणार आहेत.
रुग्णालयाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून वीजपुरवठा, पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. हळूहळू पूर्ण यंत्रसामग्री बसविण्याचे काम सुरू आहे.
डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्यचिकित्सक)



























































