
मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक नव्हे तर तब्बल ४८ घरे फोडणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ ने या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून शिवाजी संते (३१) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी या दरोडेखोराकडून १ कोटी ३९ लाख रुपयांचे दागिने व अन्य साहित्य जप्त केले आहे. यापूर्वीही त्याच्यावर कल्याण व उल्हासनगरात चार गुन्हे दाखल असून या चोरट्याची कसून चौकशी केली जात आहे.
दिव्यातील पूर्व भागात ८ फेब्रुवारी रोजी बंद घराचा दरवाजा व कडीकोयंडा तोडून दागिने व अन्य किमती साहित्याची चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास सीसीटीव्हीच्या आधारे घेतला असताना टिटवाळा येथे लपून बसलेल्या शिवाजी संते याला पोलिसांनी अटक केली. गेल्या सहा महिन्यांपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक त्याच्या मागावर होते.
आज न्यायालयात आणणार
मुंब्रा व परिसरात मागील दोन वर्षांपासून आपण ४८ घरफोड्या केल्याची कबुली आरोपी शिवाजी संते यांनी दिली आहे. त्याच्याकडून एक किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपीला उद्या बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मोडस ऑपरेंडी
आरोपी शिवाजी हा आपल्या साथीदारांच्या मदतीने बंद घराच्या बाथरूम व खिडक्यांचे लोखंडी ग्रील तोडून घरात प्रवेश करायचा. आतील दागिने चोरून तो घराबाहेर पडल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसू नये म्हणून उलट्या दिशेने प्रवास करायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.





























































